अनाधिकृत बांधकामावर केडीएमसीची कारवाई, स्थानिकांनी केला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 06:33 PM2019-03-28T18:33:09+5:302019-03-28T18:34:19+5:30
आयरे गाव परिसरातील ३१ खोल्यांसह १७ चाळींची प्लिंथची अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. त्यावेळी स्थानिकांसह रहिवाशांनी कारवाईला प्रचंड विरोध केला.
डोंबिवली: आयरे गाव परिसरातील अनधिकृत बांधकामांवर ग प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमवात यांनी बुधवारी संध्याकाळी पाडकाम कारवाई केली. त्या कारवाईमध्ये त्या परिसरातील ३१ खोल्यांसह १७ चाळींची प्लिंथची अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. त्यावेळी स्थानिकांसह रहिवाशांनी कारवाईला प्रचंड विरोध केला.
कुमावत यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यासंदर्भात आयुक्त गोविंद बोडके, उपायुक्त सुनिल जोशी यांच्याकडे तक्रारी गेल्या होत्या. त्याची दखल घेत आयुक्तांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जोशींच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी स्थानिकांचा प्रचंड असंतोष झाल्याने काही काळ स्थिती तणावाची झाली होती.
चाळींची बांधकामे करण्यासाठी प्लिंथचे काम करण्यासाठी करण्यात आले होते. त्या कच्च्या बांधकामांवर तातडीने कारवाई करण्यात आली. दोन, तीन चाळी मिळून ३१ खोल्या तोडण्यात आल्या असून तेथे पूर्ण बांधकामे झाली होती. महापालिकेच्या २५ पोलिस अधिकारी व कर्मचारी, तसेच एक जेसीबी अतिक्रमण विभागाचे २५ कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. फ प्रभागक्षेत्र अधिकारी अरूण भालेराव तसेच ई प्रभागाचे अधिकारी यांचेही सहकार्य मिळाल्याचे कुमावत यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वीच पश्चिमेतील देवीचापाडा, गोपी चौक येथेही ह प्रभागक्षेत्र अधिका-यांनी अनधिकृत बांधकांवर हातोडा मारला होता. त्यापाठोपाठ ग प्रभागात झालेल्या अनधिकृत कारवाईची शहरात चर्चा सुरू आहे.