रस्त्यावर कचरा टाकल्यास कारवाई, केडीएमसीची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 07:24 IST2020-09-17T07:24:02+5:302020-09-17T07:24:15+5:30
लॉकडाऊनमध्ये ही मोहीम राबवू नये, असे अनेक नगरसेवकांचे म्हणणे होते. मात्र, कोकरे ठाम होते. प्रमुख ठिकाणच्या कचराकुंड्या त्यांनी हटवल्या.

रस्त्यावर कचरा टाकल्यास कारवाई, केडीएमसीची मोहीम
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत रस्त्यावर कचरा टाकल्यास २०० ते तीन हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. महापालिकेच्या शून्य कचरा मोहिमेंतर्गत ही कारवाई तीव्र केली जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे.
लॉकडाऊनमध्ये ही मोहीम राबवू नये, असे अनेक नगरसेवकांचे म्हणणे होते. मात्र, कोकरे ठाम होते. प्रमुख ठिकाणच्या कचराकुंड्या त्यांनी हटवल्या. नागरिकांना घंटागाड्यांची वेळ कळवण्याबरोबरच प्रभागांमध्ये त्यांनी स्वत: शून्य कचरा मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. परंतु, आजही रस्त्यावर कचरा टाकला जात आहे.
कचरा कुठेही टाकणाऱ्यांविरोधात महापालिकेने यापूर्वी कारवाई केली आहे. हीच कारवाई आता गतिमान केली जाणार आहे. त्यासाठी बुधवारी स्वच्छता बीटमार्शल यांची संयुक्त बैठक कोकरे यांनी घेतली. यावेळी त्यांनी नागरिक व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात योग्य कारवाई केली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा संघर्ष होता कामा नये, असे बजावले. त्यानुसार, हे मार्शल गुरुवारपासून रस्त्यावर कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्यांना २०० ते तीन हजार रुपये दंड आकारणार आहेत.
दरम्यान, स्वच्छता बीटमार्शल यांना कोरोनाकाळात उपनगरांतून कल्याण-डोंबिवलीत येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांची उपस्थिती कमी झाली होती. आता अनलॉकमध्ये रस्ते वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यामुळे ५० बीटमार्शल कल्याणच्या विभागासाठी काम करणार आहेत. हे मार्शल एका खाजगी एजन्सीद्वारे नेमले आहेत. ते जितकी दंडात्मक कारवाई करतील, त्यातील ६३ टक्के रक्कम ही महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. तर, ३७ टक्के रक्कम ही बीटमार्शलच्या पगारावर खर्च केली जाणार आहे.
आधारवाडी डम्पिंगवर दररोज ४०० टन कचरा
शून्य कचरा मोहिमेमुळे आधारवाडी डम्पिंगवर कचरा कमी झाला आहे. लॉकडाऊनकाळात तो आणखी कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा अनलॉकमध्ये कचरा वाढला आहे. अगोदर डम्पिंगवर दररोज ६०० मेट्रीक टन कचरा जात होता. आता त्यात २०० मेट्रीक टनची घट झाल्याने डम्पिंगवर आता केवळ ४०० मेट्रीक टन कचरा टाकला जात आहे.