कासारवडवली परिसरातील ४० घरांवर धडक कारवाई; तीन दिवसांनंतरही सामान रस्त्यावरच
By सुरेश लोखंडे | Published: April 13, 2023 07:47 PM2023-04-13T19:47:38+5:302023-04-13T19:47:53+5:30
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, बुधवारी धडक कारवाई करण्यात आली होती.
ठाणे - येथील कासारवडवली परिसरातील ट्रॉपिकलजवळील शासकीय भूखंडावर अनधिकृतपणे ४० घरांची उभारणी करण्यात आली होती. ठाणे जिल्हाधिाकरी कायार्लयाच्या मालकीच्या या जागेवर बेकायदेशीर, अनधिकृत बांधलेल्या या घरांना चोख पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आली. आज तिसऱ्या दिवशीही या घरांमधील सामान अस्ताव्यस्त पडलेली आढळून आली.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, बुधवारी धडक कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे येथील रहिवाश्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाई दरम्यान भूमाफियांनी नायबतहसिलदार दिनेश पैठणकर यांच्याशी वाद करुन कारवाईला विराेध केला. मात्र पैठणकर यांनी कुठलीही सबब ऐकून न घेता कारवाई केल्याचे ऐकायला मिळत आहे. या धडक कारवाईसाठी पोलिस यंत्रणेचे पाठबळही फार महत्वाचे ठरले. मात्र पाेलीस कुमक घटनास्थळी येण्यास विलंब झाल्यामुळे भूमाफियांनी मात्र या कारवाईला कडाडून विराेध केल्याचे वास्तव आहे.
या सारख्या अनधिकृत व बेकायदेशीर चाळी व बांधकामांवर ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाने आता धडक कारवाई हाती घेतली आहे. त्यामुळे भूमाफियाचे धाबे दणाणले आहे. या कारवाईसाठी पैठणकर यांच्या प्रमुख भूमीकेसह कर्तव्यावर तलाठी उत्तम शेडगे, गणेश भूताळे, निलेश कांबळे, रत्नदीप कांबळे, सतिश चौधरी, हेमंत गभाले, विजय गडवे, सोमा खाकर, आदी तलाठी वगार्सह ठाणे महापालिका अतिक्रमण विभाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील,महेंद्र भोईर आदींनी या धडक कारवाईत सहभाग घेऊन भूमाफियांना धडकी भरवल्याचे पैठणकर यांनी लाेकमतला सांगितले.