दिवा, कळवा आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 27, 2023 06:52 PM2023-12-27T18:52:51+5:302023-12-27T18:53:20+5:30
खान कम्पाऊंड, मुंब्रा देवी कॉलनी, शास्त्रीनगर, बाळकूम आणि कोलशेत येथील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.
ठाणे : ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईत बुधवारी दिवा, कळवा आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या क्षेत्रात कारवाई करण्यात आली. खान कम्पाऊंड, मुंब्रा देवी कॉलनी, शास्त्रीनगर, बाळकूम आणि कोलशेत येथील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.
अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार बुधवारीही कारवाई करण्यात आली. या कारवाईत, दिवा प्रभाग समितीतील खान कम्पाऊंड येथे तळ आणि पहिल्या मजल्याचे सुमारे २५०० चौ. फूटाचे बांधकाम पाडण्यात आले. त्याच भागात, तळ आणि दोन मजले असलेले सुमारे ३००० चौ. फूटांचे आरसीसी बांधकाम पाडण्यात आले. यात तळमजल्यावरील आठ दुकानेही रिक्त करण्यात आली. याशिवाय, २००० चौ. फूटांचे प्लिंथपर्यंतचे आरसीसी बांधकाम तसेच, ४००० चौ. फूटांचे प्लिंथपर्यंतेच आरसीसी बांधकामही पाडण्यात आले. या संपूर्ण कारवाईसाठी तीन पोकलेन, एक जेसीबी, ४० कामगार आणि पोलिस व महापालिकेचे सुरक्षा रक्षक यांचे सहाय्य घेण्यात आले.
याच प्रभाग समितीतील मुंब्रा देवी कॉलनी येथील सुमारे ४० कॉलम असलेले आरसीसी प्लिंथचे बांधकाम आणि २५ कॉलम असलेले आणखी एक आरसीसी प्लिंथचे बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईसाठी दोन जेसीबी, ३० कामगार आणि पोलिस व महापालिकेचे सुरक्षा रक्षक यांचे सहाय्य घेण्यात आले. कळवा प्रभाग समिती क्षेत्रात, प्रमिला हॉस्पिटलच्या मागे शास्त्रीनगर येथे सुमारे २००० फूटांचे आरसीसी प्लिंथपर्यंतेच बांधकाम दोन जेसीबी, ३० कामगार यांच्या सहाय्याने पाडण्यात आले. माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात, बाळकूम पाडा नं. १ जोशी आळी येथील आठव्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. तर, कोलशेत येथे मरियाई नगरमधील चाळीतील दोन बैठ्या खोल्यांचे बांधकाम पाडण्यात आले.