दिवा, मुंब्रा, कळवा, माजिवडा-मानपाडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
By अजित मांडके | Published: January 12, 2024 01:57 PM2024-01-12T13:57:34+5:302024-01-12T13:57:46+5:30
अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ठाणे महापालिकेची धडक मोहीम
ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि प्रभाग समिती यांनी गुरूवारी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत दिव्यातील ०७, मुंब्रा येथील ०२, कळव्यातील ०२ आणि माजिवडा-मानपाडा भागातील दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. तसेच, दिवा भागात एकूण १९ अनधिकृत नळजोडण्या मुख्य जलवाहिनी पासून तोडण्यात आल्या.
ठाणे महापालिका क्षेत्रात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामे पूर्णपणे निष्कासित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत.
दिवा भागात, एम एस कम्पाऊंड - डीपी रस्ता भागात एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील तर दुसऱ्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील कॉलम पाडण्यात आले. दिवा पूर्व श्लोक नगर येथे सहा मजल्यांच्या अंशत: व्याप्त असलेल्या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब तोडण्यात आला. तसेच, जिनेही पाडण्यात आले. याच भागात आरती अपार्टमेंटसमोरील अनधिकृत इमारतीच्या तळमजल्यावरील गाळे तोडण्यात आले. सीताराम पाटील नगर येथील काही प्रमाणात व्याप्त असलेल्या सहा मजल्याच्या अनधिकृत इमारतीचे जिने तोडण्यात आले. तसेच, सेंट मेरी शाळेजवळील अनधिकृत पायलिंग तोडण्यात आले.
मुंब्रा येथील राणा नगर भागात अनधिकृत चौथरा, खांब काढण्यात आला. तन्वर नगर कॉम्प्लेक्समधील तळ आणि एक मजल्याचे आर सी सी बांधकाम पूर्णपणे काढण्यात आले. कळवा येथील कुंभार आळी भागात तळ मजल्याचे आर सी सी स्लॅब व दुसऱ्या मजल्या स्लॅबसाठी उभारण्यात आलेले सेंट्रीग व स्टीलचे बांधकाम काढण्यात आले. विटावा खाडीजवळील तिसऱ्या व चौथ्या मजल्याचे स्लॅब, तसेच, चौथ्या मजल्याचे अंतर्गत वीट बांधकाम तोडण्यात आले.
माजिवडा-मानपाडा भागात माजिवडा गाव येथे आरसीसीचे दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब व कॉलम तोडण्यात आले. तसेच, ओवळा नाका येथे चार अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यात आली.
१९ अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या
दिवा येथील श्लोक नगर, शास्त्री नगर, अंश नगर येथील एकूण १९ अनधिकृत नळ जोडण्या मुख्य जलवाहिनी पासून तोडण्यात आल्या. या कारवाईत पाणी पुरवठा विभागाने दोन मोटर पंप, २५ एमएमचे ६० मीटरचे आठ पाईप जप्त करण्यात आले.