कळवा खाडीतील अनाधिकृत झोपड्यांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई; रहिवाशांचा आंदोलनाचा प्रयत्न
By अजित मांडके | Published: August 25, 2023 06:14 PM2023-08-25T18:14:13+5:302023-08-25T18:14:28+5:30
कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे.
ठाणे: कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. गुरुवारी ६५ झोपड्यांवर कारवाई केल्यानंतर शुक्रवारी देखील सांयकाळ पर्यंत ५५ ते ६० झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. परंतु शुक्रवारी याठिकाणी राजकीय मंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचे दिसून आले. त्यातही ही कारवाई टाळण्यासाठी येथील रहिवाशांनी आंदोलन देखील केले. मात्र पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरुच होती. त्यानंतर येथील रहिवाशांनी पुनर्वसन मागणी करीत पुलाखालीच आपला संसार थाटला आहे.
ठाणे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीच्या माध्यमातून सध्या ही कारवाई सुरु आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता सुरु झालेली कारवाई सांयकाळी थांबविण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा येथील अतिक्रमणांवर कारवाईचा बुल्डोजर फिरविला गेला. यावेळी रहिवाशांना आंदोलनाचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न पालिकेने पोलिसांच्या मदतीने हाणून पाडला. तर शुक्रवारी जवळ जवळ सर्वच पक्षाच्या मंडळींनी येथे हजेरी लावून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तसेच येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यानंतरही ही कारवाई सुरुच होती. अखेर सांयकाळ पर्यंत पुन्हा ५५ ते ६० झोडपड्यांवर कारवाई करण्यात आली.
पुन्हा बांधकाम होऊ नये म्हणून खणला खड्डा
यापूर्वी देखील महापालिकेच्या माध्यमातून या भागात कारवाई झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा बांधकाम होतांना दिसून आले. परंतु शुक्रवारी कारवाई करतांना महापालिकेने थेट पोकलेनच खाली उतरला आणि बांबू काढतांना त्याठिकाणी खड्डा खणला. काही ठिकाणी अशाच पध्दतीने खड्डा खणल्याचे दिसून आले. त्यात खाडीचे पाणी जाऊन साचू लागले आहे. केवळ याठिकाणी पुन्हा बांधकाम होऊ नये यासाठीच ही शक्कल लढविण्याचे दिसून आले.
पुलाखालीच थाटला संसार
महापालिकेने कारवाई केल्यानंतर येथील रहिवाशांना आपल्या मुलाबाळांसह येथील पुलाखालीच संसार थाटल्याचे दिसून आले. पुनर्वसनाची मागणी करीत हे रहिवासी आक्रमक झाले होते. त्यातही ज्या काही झोपड्यांवर कारवाई झाली, त्यातील काही झोपड्यांच्या ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा देखील बसविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
१४० रहिवाशांच्या पुर्नवसनासाठी आग्रही
खाडीत झोपड्या बांधल्या गेल्या असल्या तरी येथील १४० रहिवासी हे २०११ पासून याठिकाणी वास्तव्यास असल्याने मानवतेच्या दृष्टीकोणातून त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी राजकीय मंडळींनी केली आहे. त्यानुसार त्यांचे तात्पुरत्या स्वरुपात रेंटलच्या घरात आणि नंतर हक्काच्या घरात पुनर्वसन करण्याची तयारी देखील सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.