येऊरच्या अनाधिकृत हॉटेलवर ओढवणार संक्रात
By अजित मांडके | Published: April 13, 2023 04:06 PM2023-04-13T16:06:38+5:302023-04-13T16:07:07+5:30
अनाधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची पालिकेकडून कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : येऊरमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल्सचा मुद्दा ऐरणीवर असताना ही सर्व हॉटेल्स गुरुवारपासून बंद करा हे सांगण्यासाठी वर्तकनगर प्रभाग समितीमधील अधिकारी आणि कर्मचारी येऊर परिसरात बुधवारी फिरले होते. त्यानंतर गुरुवारी मुंबईत सहयाद्री अतिथीगृहावर येऊर संदर्भात महत्वाची बैठक पार पडली. परंतु ही बैठक सुरु असतांनाच ठाणे महापालिकेने येऊर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अनाधिकृत हॉटेल्सचे पाणी बंद करण्यासाठी पुन्हा येथील हॉटेलची पाहणी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कनेक्शन अनाधिकृत असेल तर कापण्याचे आदेशही पालिकेने दिले आहेत.
येऊर मधील हॉटेल्स आणि अनधिकृतपणे बांधण्यात आलेले बंगले हे सध्या चचेर्चा विषय ठरले आहेत. येऊर येथील दिवसरात्र सुरु असलेल्या हॉटेल आणि वाढत्या ध्वनी प्रदुषणाच्या विरोधात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर स्थानिक आदिवासींनी देखील याविरोधात आवाज उठविला आहे. येथे रात्रभर सुरू असलेल्या पार्ट्या, डीजेचा आवाज, रात्रभर चालणारे क्रिकेट टर्फ, दारू व अम्ली पदार्थ विकणे, कचरा जंगलात टाकणे, अनाधिकृत पार्किंगमुळे येऊरचे अस्तित्व धोक्यात आल्याचे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे येऊर जंगल वाचवा मोहीम त्यांनी आता हाती घेतली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी येऊर आदिवासी वनहक्क समितीच्या वतीने केली होती.
याच पार्श्वभुमीवर गुरुवारी वनमंत्री सुधीर मुनगुट्टीवार यांच्या उपस्थितीत मुंबईत एक बैठक झाली. या बैठकीला राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, पालिकेचे अधिकारी, पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानुसार रात्री ११ नंतर येऊर येथील प्रवेश द्वार बंद करण्यात यावे, मोठ्या रोषणाईच्या विद्युत लाईट बंद कराव्यात, वेळप्रसंगी टर्फ उखडून टाकावेत, ध्वनी प्रदुषण होणार नाही, या दृष्टीकोणातून काळजी घ्यावी. त्याअनुषंगाने रात्री १० नंतर लग्न किंवा इतर समांरभ होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. इको सेन्सीटीव्ह झोन असल्याने प्रखर प्रकाश ज्योत आणि रात्रीच्या आवाज बंद करण्यासाठी पावले उचलावीत, पोलिसांनी अनाधिकृत हॉटेलच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अशा आशयाचे महत्वाचे आदेश या बैठकीत देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
परंतु ही बैठक सुरु असतांनाच दुसरीकडे महापालिकेने देखील एक आदेश काढून येथील अनाधिकृत नव्याने उभारलेल्या हॉटेल व बांधकामांना देण्यात आलेले पाणी कनेक्शन अधिकृत आहे किंवा नाही, याची माहिती घेतली जावी. तसेच कनेक्शन अनाधिकृत आढळल्यास ते तत्काळ खंडीत करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"