‘ठाण्यातील डान्सबारप्रकरणी पोलिसांबरोबरच उत्पादन शुल्क विभागावरही कारवाई करावी’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:57 PM2021-07-20T23:57:03+5:302021-07-20T23:57:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील डान्सबार प्रकरणी केवळ पोलिसांवरच नव्हे तर उत्पादन शुल्क विभागाच्या खात्यावरही कारवाई होणे आवश्यक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील डान्सबार प्रकरणी केवळ पोलिसांवरच नव्हे तर उत्पादन शुल्क विभागाच्या खात्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाचे अधीक्षक आणि उपअधीक्षकांना याप्रकरणी निलंबित करण्याची मागणी भाजपचे उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंद केले होते. त्याच राष्ट्रवादीकडे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस खात्याचे मंत्रिपद असताना सर्रास डान्सबार सुरु आहेत. या कृतीचा आम्ही निषेध करतोच. परंतू, केवळ पोलिसांवर कारवाई करु न चालणार नाही, याला राज्य उत्पादन शुल्क खातेही तितकेच जबाबदार आहे. राज्य उत्पादन शुल्क किंवा गृहमंत्री यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नितीन घुले यांच्यासह उपअधीक्षक चारु दत्त हांडे यांना देखील निलंबित करणार काय ? असा थेट सवाल सर्वसामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना पडलेला आहे. त्यामुळेच या दोन अधिकाऱ्यांवर तसेच राज्य उत्पादन शुल्क खात्यावरही कारवाई झाली पाहिजे. राज्यात अशा प्रकारचे डान्सबार सुरु असल्याने कडक कारवाईमुळे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाला जबाबदारीचे भान येईल, अशी टिप्पणीही लाड यांनी केली आहे.