राज्यातील आणखी सहा पेट्रोल पंपांवर कारवाई
By admin | Published: June 24, 2017 03:21 AM2017-06-24T03:21:46+5:302017-06-24T03:21:46+5:30
इलेक्ट्रॉनिक चिपद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांविरूद्ध ठाणे पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईअंतर्गत आणखी सहा पंपांवर छापा टाकण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे/औरंगाबाद : इलेक्ट्रॉनिक चिपद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांविरूद्ध ठाणे पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईअंतर्गत आणखी सहा पंपांवर छापा टाकण्यात आला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आणखी काही पेट्रोल पंपांची तपासणी सुरू होती.
कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पुणे, नाशिक, नवी मुंबई, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील सहा पेट्रोल पंपांवर ठाणे पोलिसांच्या सात पथकांनी छापा टाकला. गुरुवारी पोलिसांनी हिंदुस्तान पेट्रोलियमच्या चार आणि भारत पेट्रोलियमच्या दोन पंपांची तपासणी केली. त्यापैकी दोन पेट्रोल पंपांवर ग्राहकांना कमी पेट्रोल दिले जात असल्याचे निष्पन्न झाले. आणखी
दोन पेट्रोल पंपांवर संशय
असून, तेथील कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. औरंगाबाद आणि नागपूर येथेही ठाणे पोलिसांची पथकांकडून कारवाई सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये इंधन भरणाऱ्या डिन्स्पेन्सिंग युनिटमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप बसवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. आतापर्यंतच्या कारवाईमधून अशा प्रकारची हेराफेरी तंत्रज्ज्ञांच्या मदतीशिवाय करणे शक्य नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचे तंत्रज्ञ संशयाच्या भोवऱ्यात आहेत.