सोसायट्यांवर कारवाई
By admin | Published: September 25, 2016 04:26 AM2016-09-25T04:26:45+5:302016-09-25T04:26:45+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आॅगस्ट २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी ४६१ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ८५० नवीन मतदार याप्रमाणे एकूण ३ लाख ३८ हजार नवे मतदार
मीरा रोड: मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आॅगस्ट २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी ४६१ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ८५० नवीन मतदार याप्रमाणे एकूण ३ लाख ३८ हजार नवे मतदार नोंदवण्याचे आदेश आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी दिले आहेत. ज्या गृहनिर्माण संस्था मतदारनोंदणीकरिता कर्मचाऱ्यांना प्रवेश देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले
मतदारनोंदणीची मोहीम सुरू असून शहरातील ९ लाख ६० हजार लोकसंख्येच्या तुलनेत मतदार केवळ ४ लाख ७८ हजारच नोंदले गेले आहेत. त्यामुळे १४ आॅक्टोबरपर्यंतच्या मतदारनोंदणी मोहिमेत आणखी नवे मतदार नोंदवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबरदरम्यान नवीन मतदारनोंदणी करून मतदारयाद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक भार्इंदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगर भवन) येथील सभागृहात शुक्रवारी झाली. आयुक्त डॉ. नरेश गीते, तहसीलदार विनोद गोसावी, नायब तहसीलदार यादव, पंडित, उपायुक्त मुख्यालय विजयकुमार म्हसाळ, सचिव हरीश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
आयुक्तांनी कर्मचाऱ्यांकडून अडीअडचणी जाणून घेतल्या. दिलेल्या अर्जांची पोच न देणे, एका यादीतील नावे दुसऱ्याच यादीत टाकणे, गृहनिर्माण संस्था व रहिवाशांकडून कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारला जाणे, यापूर्वी अनेकवेळा अर्ज भरून फोटो व पुरावे देऊनही मतदारयादीत नाव न आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होणे आदी अडचणी कर्मचाऱ्यांनी मांडल्या. ज्या गृहनिर्माण संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
ओवळा-माजिवडा मतदारसंघातील अर्ज देण्यास माजिवडा येथे जावे लागत असल्याने मीरा-भार्इंदरमध्येच कार्यालय सुरू केल्यास नागरिक व कर्मचाऱ्यांची गैरसोय टळेल, असा सूर यावेळी व्यक्त झाला.
पालिकेच्या माहितीनुसार २०११च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ८ लाख ९ हजार होती. त्यात २० टक्के वाढ गृहीत धरता आजघडीला ती सुमारे ९ लाख ६० हजार इतकी आहे. सध्याच्या लोकसंख्येतील १७ वर्षांपर्यंतच्या मुलांना वगळले तर ८ लाख १६ हजार मतदार नोंदले जायला हवेत. (प्रतिनिधी)
प्रत्येक कर्मचाऱ्यास ८५० मतदारांचे टार्गेट
मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघ क्र. १४५ मध्ये ३ लाख ५६ हजार मतदार, तर ओवळा-माजिवडा-क्र. १४६ मतदारसंघांतल्या पालिका हद्दीत १ लाख २२ हजार इतके मतदार आहे. दोन्ही विधानसभा मतदारसंघांत मिळून एकूण ४ लाख ७८ हजार मतदार आहेत. म्हणजे, आणखी ३ लाख ३८ हजार नवीन मतदार नोंदवायला हवेत. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला ८५० मतदारांचे उद्दिष्ट आयुक्तांनी ठरवून दिले.
घरोघरी जाऊन मतदारनोंदणी व यादी अद्ययावतसाठी मीरा-भार्इंदर मतदारसंघात १७२ कर्मचारी व १२१ शिक्षक असे मिळून २९३ कर्मचारी, तर ओवळा-माजिवडा मतदारसंघात ७३ पालिका कर्मचारी व ९५ शिक्षक मिळून १६८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. परंतु, शिक्षकांनी सुरुवातीला काम करण्यास नकार दिल्याने मतदारयादीचे काम रेंगाळले होते. आजच्या बैठकीस शिक्षकांनी हजेरी लावून कामास सुरुवात केली आहे. पालिका शाळांमध्ये तसेच आॅनलाइनदेखील मतदारनोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.