राज्य उत्पादन शुल्क विभागाची अंबरनाथमध्ये कारवाई सुरुच
By admin | Published: July 4, 2017 10:35 PM2017-07-04T22:35:56+5:302017-07-04T22:35:56+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने सलग दुसऱ्या दिवशी अंबरनाथ तालुक्यातील मानेरा द्वारगी परिसरातील गावठी दारुच्या अड्डयांवर धाडसत्र
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 04 - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने सलग दुसऱ्या दिवशी अंबरनाथ तालुक्यातील मानेरा द्वारगी परिसरातील गावठी दारुच्या अड्डयांवर धाडसत्र राबविले. या कारवाईत तीन अड्डयांवरुन गावठी दारुसह सुमारे सात लाख ५६ हजारांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कल्याणपासून जवळच असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील द्वारली पाडयाच्या नाल्याजवळ गावठी दारु निर्मितीच्या तीन अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील आणि भरारी पथकाचे निरीक्षक एस. आर. लाड, दुय्यम निरीक्षक रविंद्र पाटणे यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे ३ ते सकाळी ११ वा. च्या दरम्यान ही कारवाई केली. यामध्ये १७७५ लीटर गावठी दारु, २९ हजार ५०० लीटर गावठी दारु बनविण्याचे रसायन, ६३० किलो काळा गुळ, एक दुचाकी असा सात लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या भरारी पथकाची चाहूल लागताच अड्डयावरील आरोपींनी मात्र धूम ठोकली. यात अनेक बॅरल आणि मद्य निर्मितीची सामुग्रीही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.