गुटख्याची तस्करी करणाऱ्या ११ जणांवर कारवाई; ट्रक चालकाला अटक, २९ लाखांचा गुटखा जप्त
By जितेंद्र कालेकर | Published: September 15, 2023 09:17 PM2023-09-15T21:17:52+5:302023-09-15T21:18:02+5:30
कारवाईत रफिकमिया याच्यासह ११ जणांविरुद्ध आज गुन्हा दाखल झाला असून अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे : महाराष्ट्रात विक्री आणि वाहतुकीला बंदी असलेल्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या रफिकमिया मेहबूब साब (४५, रा. कप्परगाव, कर्नाटक) याला श्रीनगर (ठाणे) पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून २९ लाख ५० हजारांच्या गुटख्यासह ट्रक आणि इतर सामग्री असा ४४ लाख ५० हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईत रफिकमिया याच्यासह ११ जणांविरुद्ध आज गुन्हा दाखल झाला असून अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्याच्या वागळे इस्टेट भागातून ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण काबाडी यांना मिळाली होती. त्याआधारे श्रीनगर पोलिसांसह अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी राजू आकरूपे यांच्या पथकाने संयुक्तरीत्या १४ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास वागळे इस्टेट भागातील रायलादेवी तलावासमोरील रोड क्रमांक १६ भागात सापळा रचून रफिकमिया याला गुटख्याच्या ट्रकसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून २९ लाख ५० हजार ५६० रुपयांचा एक हजार ४७५.२८ किलोचा गुटखासदृश साठा (यामध्ये १८० ग्रॅमचे आठ हजार १९६ हाेलसेल पॅक) तसेच १५ लाखांचा ट्रक असा ४४ लाख ५० हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.