उल्हासनगरात ११ हजार जणांवर केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:35 AM2021-07-26T04:35:47+5:302021-07-26T04:35:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाकाळात थकबाकीदारांची संख्या वाढताच महावितरणने कारवाईचा बडगा उगारला असून सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : कोरोनाकाळात थकबाकीदारांची संख्या वाढताच महावितरणने कारवाईचा बडगा उगारला असून सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त वीजग्राहकांवर कारवाई केली आहे. एकूण ५५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अभियंत्यांनी केले आहे.
उल्हासनगरातील कॅम्प नं- १,२ व ३ (पश्चिम) विभाग हा महावितरण कंपनीच्या विभाग-१ मध्ये, तर कॅम्प नं- ४ व ५ (शहर पूर्व) परिसरासह अंबरनाथ शहर हे महावितरणच्या विभाग-२ मध्ये येतो. महावितरण कंपनीच्या विभाग-१ मध्ये ९६ हजारांपेक्षा जास्त वीजमीटरची संख्या आहे. तर विभाग-२ मध्ये शहर पूर्वेतील ७५ हजारांपेक्षा जास्त वीजमीटर ग्राहक असून त्यामध्ये वाणिज्य व सामाजिक संस्था, देवस्थान यांचा समावेश आहे. शहरात अशी एकूण १ लाख ७० हजारांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या तर बहुतांश जणांच्या वेतनात कपात झाली. व्यवसायाला उतरती कळा लागून अनेक जण बेकार झाले. परिणामी, यातूनच वीजमाफी व वीजबिल कमी करण्याची मागणी नागरिकांकडून झाली. वीजबिल माफ होईल अथवा कमी होईल, या आशेतून कोरोना दरम्यानच्या काळात अनेकांनी वीजबिलांचा भरणा नियमित केला नाही. त्यामुळे वीजबिल थकबाकीची संख्या वाढली.
शहरात एकूण १ लाख ७५ हजारांपेक्षा जास्त वीजग्राहकांची संख्या आहे. त्यापैकी थकबाकी ग्राहकांची संख्या ५५ हजारांपेक्षा जास्त असून त्यांची टक्केवारी ३० टक्के आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता अशोक सावंत व राजाराम राठोड यांनी दिली. नागरिकांनी वेळेत वीजबिलाचा भरणा केल्यास थकबाकीची संख्या कमी होईल, असे ते म्हणाले. तसेच थकबाकी असलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत दिल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या सहा महिन्यांत ११ हजारांपेक्षा जास्त थकबाकीधारकांवर महावितरणने कारवाई केली असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत दिले. थकबाकीधारकांमध्ये बंद घरे, दुकाने, लहान कारखाने यांचा समावेश असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात थकबाकीवरील कारवाईच्यावेळी महावितरण कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या रोषाला बळी पडत असून यातून हाणामारीचे प्रकार झाले आहेत.
-------------------------------
माफी नको, मात्र सवलत द्या
कोरोनाकाळात वीजबिले दुप्पट आली असून वाढीव बिले राज्य सरकार कमी करेल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र, उलट घरगुती थकबाकी वीजग्राहकांची वीज खंडित करण्याच्या प्रमाणात वाढ झाली, असा आरोप एका थकबाकी वीजग्राहकाने केला. घरात वीजपुरवठा सुरू नसल्यास सर्वच कामे ठप्प पडतात. सरकरने वीजमाफी नको, मात्र सवलत द्यावी. वीजपुरवठा खंडित करू नये, अशी सूचनावजा विनंती केली.