वीकेंड निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार २४८ वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:38 AM2021-04-12T04:38:03+5:302021-04-12T04:38:03+5:30
ठाणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम सुरू केली आहे. सर्वत्र निर्बंध लागू असतानाही ...
ठाणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम सुरू केली आहे. सर्वत्र निर्बंध लागू असतानाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ठाण्यात शनिवारी एक हजार २४८ वाहन चालकांवर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले. या मोहिमेंतर्गत शनिवारी मोटारसायकलने जाणाऱ्या १७, तर रिक्षातून चालकाशेजारी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ५९ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कलम १७९ अन्वये लागू केलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार १७२, अशा एकूण एक हजार २४८ वाहन चालकांविरोधात ही कारवाई करण्यात आली.
................
३८६ वाहनांवर जप्तीची कारवाई
शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पूर्णपणे निर्बंध लागू असतानाही अत्यावश्यक कारणाशिवाय वाहने घेऊन बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांवरही वाहने जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये दुचाकी - २३८, तीनचाकी - १२४ आणि मोटारकार २४, अशी ३८६ वाहने जप्त करण्यात आली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे पालन वाहन चालकांनी करावे, तसेच यापुढे होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.