उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यावर धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 05:54 PM2023-10-06T17:54:44+5:302023-10-06T17:55:43+5:30
कारवाई दरम्यान कार विक्रेते, गॅरेजमालक व कार डेकोरेटर यांच्यावर कारवाई करुन, २३ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तसेच रस्त्यांवर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले.
उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर वाहने व विविध वस्तू विक्रीसाठी ठेवणाऱ्या कार विक्रेते, कार डेकोरेटर, गॅरेजवाल्यासह इतर दुकानदारावर महापालिकेने सलग दोन दिवस धडक कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. यानंतरही अशी कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत लेंगरेकर यांनी दिले आहे.
उल्हासनगरातून जाणाऱ्या मुख्य कल्याण - अंबरनाथ रस्त्यावर वाहन व विविध वस्तू विकणाऱ्या दुकानदारांनी बस्थान बसविले. याचा परिणाम वाहतूक कोंडी व लहान मोठ्या अपघातात झाला. याबाबत असंख्य तक्रारी आयुक्त अजीज शेख यांच्याकडे आल्यावर आयुक्तांनी प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, दत्तात्रय जाधव, जेठानंद करमचंदानी व अनिल खतुरानी यांच्या पथकांनी वाहतुकीस अडथळा करणा-या कार विक्रेते, कार डेकोरेटर गॅरेज मालक व इतर दुकानदार यांचे विरुद्ध बुधवारी व गुरवारी अशी सलग दोन दिवस कारवाई केली.
कारवाई दरम्यान कार विक्रेते, गॅरेजमालक व कार डेकोरेटर यांच्यावर कारवाई करुन, २३ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तसेच रस्त्यांवर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले. यापुढे रस्त्यावर वाहने उभी न करण्यासाठी कार विक्रेते, गॅरेजमालक व इतरांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे. सहा महिन्यात २ लाख १९ हजाराचा दंड
शहरातील मुख्य रस्ते, चौक, पदपथ आदी ठिकाणी अतिक्रमण करणारे फेरीवाले, बेकायदा वाहन पार्किंग तसेच रस्त्यावरील कार विक्रीसाठी अनधिकृतपणे वाहने उभी करणा-या विरोधात महापालिकेने धडक करवाई केली.
गेल्या सहा महिन्यात २ लाख १९ हजार ९५० रुपये दंड
वसूल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनीं दिली आहे. तसेच ही कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत त्यांनी दिले आहे.