थर्मोकोल मखरची विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:48 AM2021-09-08T04:48:23+5:302021-09-08T04:48:23+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील नेहरू चौक परिसरात बंदी असतांना थर्मोकोल मखरची विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर प्रदूषण मंडळ व ...
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील नेहरू चौक परिसरात बंदी असतांना थर्मोकोल मखरची विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर प्रदूषण मंडळ व महापालिकेने कारवाई केली. त्यांच्याकडून १२५ मखर व थर्मोकोलचे साहित्य जप्त केल्याची माहिती उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली.
उल्हासनगर मार्केटमध्ये गणेशोत्सवाच्या आरासचे साहित्य खरेदीसाठी कर्जत, कसारा, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर व ग्रामीण परिसरातून शेकडो नागरिक येतात. भारत ट्रेडर्स व जय माता दी या दुकानात बंदी असतानाही थर्मोकोलचे मखर विक्रीसाठी ठेवल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेला मिळाली होती. त्याआधारे प्रदूषण मंडळाचे अनिरुद्ध वैराळे व महापालिका उपायुक्त मदन सोंडे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी संयुक्तपणे दोन्ही दुकानांवर सोमवारी कारवाई केली. दुकानदारांकडून लाखो रुपये किमतीचे मखर व इतर साहित्य जप्त केले. जप्त केलेले मखर डम्पिंग ग्राउंडवर नष्ट केले जाणार असल्याची माहिती केणे यांनी दिली.
गेल्या शनिवार व रविवारी नागरिकांनी साहित्य खरेदीसाठी उच्चांकी गर्दी केली होती. नागरिक व दुकानदारांनी कोरोनाचा विसर पडू देऊ नये, कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सोंडे यांनी केले.