आॅपरेशनसाठी लागणा-या अवैध धागा उत्पादनावर भिवंडीत केंद्रीय औषध विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:33 PM2018-03-08T13:33:11+5:302018-03-08T13:33:11+5:30
भिवंडी : शस्त्रक्रियेदरम्यान रूग्णांची जखम शिवण्यासाठी(टाके घालण्यासाठी) लागणा-या धाग्यांचे अवैधपणे उत्पादन करणा-या कंपनीवर केंद्रीय अन्न व औषधे विभागाने छापा टाकून कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
तालुक्यातील सावंदे गावात साईनाथ कंपाऊण्डमध्ये यंत्रमाग कारखान्याच्या गाळ्यात ही कंपनी सुरू केली होती. त्यामध्ये केंद्रीय अन्न व औषध विभागाचे अधिकारी डॉ.विजयसिंग करवासरा यांनी छापा टाकला असता देवनारच्या कत्तलखान्यातून मेलेल्या जनावराच्या आतड्यापासून धागा बनविण्याची धोकादायक प्रक्रिया सुरू होती. मेलेल्या जनावरांच्या आतड्यावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता त्यास मिठात जतन करून त्यास स्लायशिंग मशीनने कापून त्यावर टष्ट्वीस्टींग करून ते धागे वाळविले जात होते. तसेच त्या धाग्यांना ग्रायडरच्या सहाय्याने पॉलिश करून क्रोमिस्क सोल्युशनमध्ये रंग देऊन ते प्लास्टिकच्या पिशवीत सिलबंद केले जात होते. त्याची शहरात व शहराबाहेरील खाजगी रूग्णालयांत विक्री करीत होते.या धाग्यांना रासायनिक प्रक्रीयेव्दारे न बनविल्याने ते धोकादायक आहे. तसेच हे उत्पादन औषधांच्या (मेडीसिन) कार्यकक्षेत येत असल्याने त्याची शासनाच्या संबधित विभागाकडून अधिकृत मान्यता न घेता उत्पादन व विक्री केल्याने रूग्णांना धोकादायक आहे,अशी माहिती केंद्राच्या औषधे प्रशासनाच्या अधिका-यांनी दिली.या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात एजाज अहमद अफसर, इम्तियाज अब्बास अहमद शेख, सरफराज अहमद अबझार अहमद (धारावी,मुंबई) मोहमंद झीशान निसार अहमद मवाई (कुंदा प्रतापगड, उत्तरप्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन हे आरोपी फरार झाल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी दिली. तसेच केंद्रीय औषधे प्रशासनाच्या सुचनेनुसार पोलीसांनी ही कंपनी आंतील मशीनरी व धाग्यांच्या बंडलासह सील केली आहे. मात्र ही कंपनी किती दिवसांपासून सुरू होती,या बाबत सांगण्यास नकार दिला.