मंदिरावर बुलडोझर, कल्याण पूर्वेतील मंदिर, गणेशोत्सवात टळली होती कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 03:18 AM2017-09-20T03:18:00+5:302017-09-20T03:18:05+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने पूर्वेतील बेकायदा गणेश मंदिरावरील कारवाई तात्पुरती स्थगित केली होती. अखेर या मंदिरावर मंगळवारी केडीएमसीने बुलडोझर चालवला.
कल्याण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने पूर्वेतील बेकायदा गणेश मंदिरावरील कारवाई तात्पुरती स्थगित केली होती. अखेर या मंदिरावर मंगळवारी केडीएमसीने बुलडोझर चालवला. दरम्यान, न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना मंदिर तोडल्याचा आरोप येथील हनुमान सेवा मंडळाने केला आहे.
उच्च न्यायालयाने रस्त्यात अडथळा ठरणारी तसेच पदपथावरील बेकायदा प्रार्थनास्थळे हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सप्टेंबर अखेरपर्यंत केडीएमसीला आपल्या हद्दीतील अशा प्रार्थनास्थळांवर कारवाई करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावयाचा आहे. त्यामुळे महापालिकेने बेकायदा धार्मिक स्थळांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सर्वात अगोदर रस्ता वाहतुकीला अडथळा ठरलेले कल्याण पश्चिमेतील सुभेदारवाडा शाळेलगतचे दुर्गामाता मंदिर तोडण्यात आले. त्यानंतर १० जुलैला डोंबिवली पश्चिमेतील रेल्वेस्थानकासमोरील पदपथावरील जुन्या गणपती मंदिरावर महापालिकेने हातोडा चालवाला. रस्त्यात अडथळा न ठरणारे आणि एका आडोशाला असलेल्या या मंदिरावर झालेली कारवाई भाविकांच्या जिव्हारी लागली होती.
गणेशोत्सवाच्या तोंडावर १८ आॅगस्टला कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथील गणेश मंदिरावर कारवाईसाठी महापालिकेचे पथक गेले होते. त्याची माहिती मिळताच १५० ते २०० भाविकांनी गर्दी करत कारवाईला तीव्र विरोध केला. गणेशोत्सवाच्या धर्तीवर कारवाई होऊ दिली जाणार नाही, असा पवित्रा भाविक व हनुमान सेवा मंडळाने घेतला होता. त्यावेळी उपस्थित भाविकांनी सामूहिक आरतीही म्हंटली होती. हा विरोध पाहता तसेच गणेशोत्सवानंतर कारवाई करू देण्याची लेखी हमी घेतल्यानंतर महापालिकेने ही कारवाई तात्पुरती स्थगित केली होती.
दरम्यान, महापालिकेच्या ‘जे’ प्रभाग कार्यालयाने मंगळवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात ३० वर्षे जुने असलेले हे गणेश मंदिर तोडले. या कारवाईमुळे भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
>मूर्ती स्वीकारण्यास मंडळाचा नकार
मंगळवारच्या कारवाईच्या वेळी येथील गणपतीची मूर्ती मंदिराची सेवा करणाºया हनुमान सेवा मंडळाच्या ताब्यात दिली जात होती. परंतु, कारवाईला न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना महापालिकेने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ ही मूर्ती स्वीकारण्यास मंडळाच्या पदाधिकाºयांनी नकार दिला. अखेर महापालिकेने ही मूर्ती ताब्यात घेतली. न्यायालयाचा स्थगिती असतानाही पालिकेने कारवाई केल्याचे मंडळाचे अध्यक्ष अरुण दिघे यांनी सांगितले. याबाबत ‘जे’ प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही.