चिखलोलीतून पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: March 19, 2016 12:44 AM2016-03-19T00:44:04+5:302016-03-19T00:44:04+5:30
चिखलोली धरणातून दररोज १०० पेक्षा अधिक टँकर पाणी चोरले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार
अंबरनाथ : चिखलोली धरणातून दररोज १०० पेक्षा अधिक टँकर पाणी चोरले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. ते मिळताच या टँकरवर, पाणीचोरांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
चिखलोली धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित असतानाही धरणाच्या मागील परिसरातून काही टँकरमाफिया कोणतीही परवानगी न घेता पाणी चोरत होते. एवढेच नव्हे, तर टँकर भरण्यासाठी धरणाच्या पात्रात पंपही बसवण्यात आले होते. दररोज १०० पेक्षा अधिक टँकर भरून बाहेर पाण्याची विक्री-काळाबाजार सुरू होता.
कोणीच कारवाई करीत नसल्याने बदलापूर आणि उल्हासनगरहूनही अनेक टँकर येथे पाणी भरण्यासाठी येत होते. यासंदर्भात गुरुवारी ‘लोकमत’मध्ये छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध होताच जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी तत्काळ मुख्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. मुख्याधिकारी गणेश देशमुख आणि तहसीलदार प्रशांत जोशी हे धरणाच्या ठिकाणी कारवाईसाठी गेले.
मात्र, ‘लोकमत’मधील बातमीनंतर घाबरगुंडी उडालेल्या टँकरमाफियांनी येथे टँकर भरण्याचे काम थांबवल्याचे दिसून आले. कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना तेथे एकही टँकर सापडला नाही. अखेर धरणात बसवलेले पंप जप्त करण्यात आले. तसेच धरणात कोणताही टँकर जाऊ नये, यासाठी रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला. कारवाईदरम्यान एकही टँकर सापडला नसला तरी बातमीमुळे टँकरमाफियांमध्ये घबराट उडाली.
(प्रतिनिधी)