शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांच्या अनधिकृत तीन मजली इमारतीवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 08:36 PM2017-11-27T20:36:26+5:302017-11-27T20:36:47+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेला सत्ताधा-यांनी दिलेल्या असहाकाराच्या इशा-यामुळे प्रशासनाने सोमवारी मीरागाव येथील शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांच्या तीन मजली अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई केली.
- राजू काळे
भाईंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेला सत्ताधा-यांनी दिलेल्या असहाकाराच्या इशा-यामुळे प्रशासनाने सोमवारी मीरागाव येथील शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांच्या तीन मजली अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई केली. मात्र ही कारावाई सत्ताधा-यांच्या दबावाखाली केली जात असल्याचा आरोप कमलेश यांनी केला आहे.
शहरातील अनधिकृत बांधकाम भ्रष्ट प्रशासकीय अधिका-यांमुळे वाढत असून त्याविरोधात सत्ताधारी भाजपा नगरसेवक तक्रारी करुनही प्रशासन कारवाई करीत नसल्याने संतप्त झालेल्या महापौर डिंपल मेहता यांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांना असहकाराचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवर १७ नोव्हेंबरपासून तोडक कारवाई सुरु केली. मात्र ही कारवाई प्रशासन सत्ताधा-यांच्या दबावाखाली सरसकट न करता केवळ विरोधी पक्षाच्या निकटवर्तीयांच्या बांधकामांवर करीत असल्याचा आरोप सेना व काँग्रेस या विरोधी पक्षांकडुन करण्यात येत आहे. २३ नोव्हेंबरला काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व मुझफ्फर हुसेन यांचे बंधू मुनावर हुसेन यांच्या १० मजली बांधकामावर तोडक कारवाई करुन त्यांच्यावर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर मीरागाव येथील कृष्णस्थळ परिसरात असलेल्या यशवंत भवन या तीन मजली इमारतीवर बुलडोजर फिरविण्यात आला. ही इमारत शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांची असल्याचा दावा प्रशासनाकडुन करण्यात येत आहे. मात्र या कारवाईतुन भाजपातीलच अनधिकृत बांधकाम माफीयांना वगळल्याचा आरोप केला जात असून त्यात अलिकडेच हाटकेश परिसरात उद्यानाचे आरक्षण असलेल्या जागेवर बारचे बेकायदेशीर बांधकाम सुरु असल्याचे सेनेचे शाखाप्रमुख महेश शिंदे यांनी उघडकीस आणले. हे बांधकाम करणारी व्यक्ती भाजपाची समर्थक असल्यानेच त्याविरोधात अनेकदा तक्रारी करुनही ते अद्याप तोडण्यात आले नसल्याचा दावा केला जात आहे. यावरुन तोडक कारवाईतून वाचलेले सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधीच खरे लाभार्थी ठरत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येऊ लागली आहे.
तोडण्यात आलेली तीन मजली इमारत वडील यशवंत यांची असुन त्याचा आपल्याशी कोणताही संबंध नाही. प्रशासनाने विरोधी पक्षांच्या बांधकामांवर सुरु केलेली एकतर्फी कारवाई स्थानिक भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष मुकेश मेहता यांच्या १० मजली अनधिकृत इमारतीसह स्थानिक नगरसेविका वीणा भोईर यांच्या बेकायदेशीर बंगल्यावर देखील कारवाई होणे अपेक्षित आहे.
- कमलेश भोईर, शिवसेना नगरसेवक
या इमारतीची जागा स्व. यशवंत भोईर यांच्या मालकीची असुन त्यावर त्यांनी बांधलेल्या सत्यम, शिवम इमारतीतील रहिवाशांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या सुविधा भुखंडावर ती बेकायदेशीर तीन मजली इमारत बांधण्यात आली होती. तीचे बांधकाम यशवंत भोईर यांच्या निधनानंतर सुरु करण्यात आल्याने त्यांचा बांधकामाशी कोणताही संबंध नसल्याची तक्रार पालिकेकडे अगोदरच केलेली आहे.
- गजानन नागे, अध्यक्ष, भाजपाचे सृष्टी मंडळ
पालिकेची रितसर परवानगी घेऊनच बंगला बांधला असुन कमलेश यांनी केलेला आरोप खोटा आहे. त्यांचेच शहरात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे असुन ती वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. कोणावरही खोटे आरोप करु नयेत.
- वीणा भोईर, भाजपा, नगरसेविका
त्या इमारतीवरील कारवाईपुर्वी प्रशासनाने कमलेश यांच्याच नावे नोटीस पाठविली होती. त्यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नसल्यानेच ती अवैध ठरली. कमलेश यांनी केलेल्या आरोपानुसार माझी कोणतीही १० मजली इमारत नाही. तसे त्यांनी सिद्ध करुन पालिकेकडे कारवाईसाठी तक्रार करावी. त्या इमारतीवर झालेल्या कारवाईमुळेच कमलेश खोटे आरोप करीत सुटले आहेत.
- मुकेश मेहता, भाजपा उपजिल्हाध्यक्ष, मीरा-भार्इंदर