सहायक आयुक्त आणि अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:48 AM2021-09-08T04:48:05+5:302021-09-08T04:48:05+5:30
ठाणे : कोरोनाच्या आड किंवा गावठाणच्या आड ज्या काही तीन ते चार महिन्यांत बेकायदा इमारती बांधल्या गेल्या आहेत. ...
ठाणे : कोरोनाच्या आड किंवा गावठाणच्या आड ज्या काही तीन ते चार महिन्यांत बेकायदा इमारती बांधल्या गेल्या आहेत. त्या इमारती पडल्या, तर ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात इमारत उभारली गेली असेल, त्या सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव महापौर नरेश म्हस्के यांनी सोमवारी महानगरपालिकेच्या महासभेत मांडला.
सोमवारी महासभेत फेरीवाल्यांच्या मुद्द्याबरोबरच अनधिकृत बांधकामांचा मुद्दाही चर्चेत आला. विक्रांत चव्हाण यांनी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्यांच्या विरोधात ठराव करण्याची मागणी केली. मिलिंद पाटणकर यांनीदेखील सहायक आयुक्तांच्या बदल्या झाल्यानंतर त्यात्या प्रभाग समितीत कारवाया झाल्या. परंतु, केवळ बदल्या करून या कारवाया झाल्या का, असा सवालही त्यांनी केला. आधी ज्या प्रभाग समितीत संबंधित सहायक आयुक्त होता, त्यावेळेस त्याला ते बांधकाम दिसले नाही का, असा सवालही त्यांनी केला. केवळ बदली करून गुन्ह्यातून माफी देण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
गावठाण भागातील रहिवाशांना दुरुस्तीची परवानगी मिळत नसल्याने तेथील रहिवासी अशा प्रकारे बांधकामे उभारत असतात. त्यामुळे यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी यावेळी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी केली.
सर्वपक्षीय सदस्यांनी केलेल्या चर्चेनंतर महापौरांनी वर्तकनगर भागात कारवाई करण्यासाठी गेल्यावर तेथील सहायक आयुक्त सचिन बोरसे हे संबंधिताला महापौर कारवाई करण्यासाठी सांगत असल्याचे सांगतात. याचा मला फरक पडत नाही. मात्र, हे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.