लोकमत इम्पॅक्ट! आवाजाच्या मर्यादेचा भंग करणाऱ्या गरबा आयोजकांवर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 09:58 PM2018-10-13T21:58:05+5:302018-10-13T22:01:52+5:30
लोकमतच्या बातमीनंतर पोलिसांकडून आयोजकांना कारवाईचा इशारा
मीरारोड - मीरारोडमध्ये रात्री ११ नंतरही सर्रास गरब्याचा दणदणाट सुरु असल्याचे वृत्त लोकमतने देताच पोलिसांनी नवरात्रोत्सव मंडळांची बैठक घेऊन रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक वा वाद्यवृंद सुरु असेल तर गुन्हा दाखल करु असा इशारा दिला आहे. पोलिसांनी कारवाईसाठी विशेष पथक सुध्दा नेमले आहे. यामुळे रात्री उशीरापर्यंत कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाला लगाम घालून पोलीस सामान्य नागरिकांना दिलासा देतील अशी आशा व्यक्त होत आहे.
मीरा भार्इंदरमध्ये राजकारण्यांसह अनेक मंडळांनी आणि गृहसंकुलांनी नवरात्र निमित्त गरबा - दांडियाचे आयोजन केले आहे. राजकारण्यांकडून तर गरबा उशीरापर्यंत सुरु ठेवण्यात मोठेपणा मिरवला जात आहे. ध्वनी प्रदुषणाच्या कायद्यासह उच्च न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली दाखवण्याचे काम मीरारोड आणि भाईंदरमध्ये अगदी बिनदिक्कतपणे सुरू आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुलं यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. तर विद्यार्थी व नोकरदार वर्गालादेखील नाहक जाच सहन करावा लागत आहे.
रात्री १० पर्यंत ध्वनीक्षेपकास परवानगी असताना देखील रात्री ११ तर काही भागात चक्क रात्री १२ पर्यंत सर्रास ध्वनीक्षेपक व वाद्यवृंद वाजवले जाते. पोलिसांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष करत आयोजकांना ११ वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करण्याची अलिखीत परवानगीच दिल्याची चर्चा होती. त्यामुळेच पोलिसांकडून कारवाई होत नव्हती. लोकमतच्या शनिवारच्या हॅलो ठाणेमध्ये या बाबतचे वृत्त येताच वरिष्ठ स्तरावरुन हालचाली सुरु झाल्या. पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी ध्वनी मर्यादेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना दिले. सहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनीदेखील सर्व आयोजकांना पाचारण करुन रात्री १० नंतर आवाज केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.