मामा - भांजे डोंगरावरील 'लॅण्ड जिहाद' विरोधात होणार कारवाई, ठाणे पोलिसांची मनसेला लेखी हमी
By अजित मांडके | Published: May 4, 2023 05:12 PM2023-05-04T17:12:20+5:302023-05-04T17:12:34+5:30
अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत शासकीय पातळीवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची पोलिसांनी पत्राद्वारे हमी दिली आहे.
ठाणे : दोन दिवसांपूर्वी अनधिकृत धर्मस्थळापेक्षा देशाची सुरक्षा महत्वाची असल्याने प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ हटवावे, अन्यथा, दर्ग्याशेजारीच शंकराचे मंदिर उभारण्याचा इशारा मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे दिला होता. याची दखल घेत दोन्ही दर्ग्याच्या आजूबाजूला असलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत शासकीय पातळीवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची पोलिसांनी पत्राद्वारे हमी दिली आहे.
येऊरमधील या मामा-भांजे दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या कान्हेरी हिल येथील भारतीय वायुसेनेच्या तळाला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत, भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना पत्रव्यवहार करून येथील बेकायदा बांधकामे त्वरीत हटविण्याची मागणी केली होती. मात्र, ढिम्म प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही.
येऊरमधील मामा भांजे डोंगरावर गेले बरेच वर्षांपासून दोन दर्गे आहेत. त्यापैकी एक दर्गा हा वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून दुसरा दर्गा श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत आहे. या दोन्ही दर्ग्याचे आजूबाजूला असलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत शासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच हे अतिक्रमण वन विभागाच्या जागेवर असल्याने अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी वन विभाग आणि ठाणे महानगरपालिकेची असून संबंधीत विभागाला पोलिसांनी लेखी पत्राद्वारे कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करूनही वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने येथील बेकायदा बांधकामे त्वरीत हटविण्यासंदर्भात कोणतीच पावलं उचलली नव्हती. अखेर मनसेने अतिक्रमण हटविण्यासंदर्भात प्रशासनाला मागणी केली. त्यानंतर दोन दिवसातच अखेर प्रशासनाला जाग आली असून याची दखल घेत कारवाई होण्याची हमी पोलिसांनी पत्राद्वारे दिली आहे तसेच या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य न करण्याचे आवाहन केले आहे.