प्रिंटरवरच उगारणार कारवाईचा बडगा; बेकायदा बॅनरबाजीला बसवणार चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 02:42 AM2018-07-24T02:42:49+5:302018-07-24T02:43:12+5:30
मीरा-भार्इंदर आयुक्तांचा निर्णय
मीरा रोड : मुंबई उच्च न्यायालयाने सातत्याने बेकायदा बॅनर आणि बॅनरबाज लोकप्रतिनिधी आदींवर कारवाईचे आदेश देऊनही मीरा - भार्इंदरमध्ये सर्रास बेकायदा बॅनर लावले जात आहेत. मात्र, आयुक्त बालाजी खतगावकर यांनी यासंदर्भात आदेश दिल्यानंतर लागलेले बॅनर काढण्याची कारवाई प्रशासनाने केली. या बेकायदा बॅनरबाजीला चाप लावण्यासाठी आयुक्तांनी थेट प्रिंटरवरच कारवाईचा बडगा उगारण्याचा रामबाण उपाय शोधला असून त्याची बैठक बोलावली आहे.
सवंग आणि फुकटच्या प्रसिद्धीसाठी मीरा भार्इंदरमध्ये महापौर, आमदार, नगरसेवक, राजकीय तसेच संस्थांचे पदाधिकारी यांकडून सर्रास बेकायदेशी बॅनर लावले जात आहेत. यामुळे शहर विदू्रप झाले आहे. पदपथ, चौक, सिग्नल, वाहतूक बेट, रस्ते, वीजेचे खांब, झाडे येथे उघडपणे असे बेकायदा बॅनर लावले जातात. यामुळे रहदारी तसेच वाहतुकीला नेहमीच अडथळा होतो. झाडांवर बॅनर लावताना फांद्या तोडणे, तार आणि दोऱ्यांनी बांधणे, खिळे ठोकणे असे प्रकार करून झाडांना इजा पोहोचवली जाते. बेकायदा बॅनरबाजीमुळे लोकप्रतिनिधी, संस्था हे महापालिकेचे परवानगी शुल्क बुडवत आहेत. शिवाय लावलेले बॅनर पालिकेलाच काढावे लागत असल्याने महसूल तर बुडतोच शिवाय बॅनर काढायच्या खर्चाचा भुर्दंड देखील सोसावा लागतो.
मुंबई उच्च न्यायालयाने सातत्याने बेकायदा बॅनर आणि बॅनरबाज लोकप्रतिनिधींवर कारवाईचे आदेश देऊनही मीरा भार्इंदरमध्ये खुद्द महापौर डिम्पल मेहता, आ. नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक, सर्वच सभापती - नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी - कार्यकर्ते, संस्थांचे पदाधिकारी यांकडून न्यायालयीन आदेशांना केराची टोपली दाखवली जात आहे. लोकप्रतिनिधी, राजकारणी आणि संस्थांनीच शहरात बेकायदा बॅनर लावून विद्रुपीकरण चालवले आहे. लोकप्रतिनिधी, राजकारणीच बेकायदा बॅनरबाजी करत असल्याने पालिका अधिकारी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. पालिका प्रशासनाच्या बोटचेपेपणामुळे शहरात बॅनरबाज मोकाट असून लोकप्रतिनिधी निर्ढावले आहेत. इतके बॅनर शहरात लागत असताना पालिकेने एकाही लोकप्रतिनिधीवर बेकायदा बॅनरचा गुन्हा दाखल केलेला नाही.
या बेकायदा बॅनरबाजीबद्दल अखेर आयुक्त खतगावकर यांच्याकडे तक्र ार गेली. आणि त्यांनी अतिक्र मण विभाग प्रमुख संजय दोंदे आणि संबंधितांना कारवाईचे आदेश दिले. त्या नंतर काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात लागलेले बेकायदा बॅनर काढण्याची कारवाई पालिकेने सुरू केली. परंतु अजून या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास टोलवाटोलवी सुरू असल्याचे सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता म्हणाले. बॅनर विरोधात सतत तक्र ारी करून देखील कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
दरम्यान बॅनरबाजीला आळा घालण्यासाठी आयुक्त खतगावकर यांनी थेट मुळावरच कारवाईचा पवित्रा घेतला आहे. शहरात बॅनर छापणाºया प्रिंटरनाच आयुक्तांनी कारवाईच्या रडारवर घेतले आहे. बॅनर छापणारे हे प्रिंटरच शहरात सर्वत्र बॅनर लावण्याचे काम देखील करतात.
पालिकेची परवानगीचा क्र मांक, मुदत तारीख , परवानगी धारकाचे नाव आदी बॅनरवर छापणे बंधनकारक असते. झाडं, सिग्नल, विजेचे खांब, रस्ता, वाहतूक बेट येथे बॅनर लावू नये याची देखील या प्रिंटरना पूर्ण कल्पना असते. तरीही बॅनर छापताना त्यावर पालिकेच्या मंजुरीचा जावक क्र मांक, मुदत, संख्या आदी काहीच छापत नाहीत. लावलेले बॅनर देखील ते काढून घेत नाहीत.