चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई - दिपक केसरकर
By अजित मांडके | Published: August 13, 2023 08:12 PM2023-08-13T20:12:14+5:302023-08-13T20:14:40+5:30
रूग्णालयात गेल्या ४८ तासांत तब्बल १८ रूग्णांचा मृत्यू
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्युची कारणे वेगवेगळी आहेत. परंतु रुग्णालयातील मृत्युचा रेषो हा ४.५ टक्के एवढा आहे. असे असतांनाही जे १८ मृत्यु झालेले आहेत, ते मृत्युच्या रेषोपेक्षा अधिक असल्याने त्यासाठीच हाय कमिटी चौकशी नेमण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. त्यातही मृत्यु जर नैसर्गिक झाले असतील तर त्यांना मदत देता येणार नाही. परंतु यंत्रणेच्या चुकांमुळे मृत्यु झाले असतील तर तशांना मदत देता येणे शक्य आहे. त्यातही चौकशीत यंत्रणांची चुक निदर्शनास आली तर जे दोषी असतील त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
कळवा रुग्णालयात शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी सकाळी ८.३० वाजेदरम्यान १८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यानंतर कळवा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले. या घटनेनंतर या रुग्णालयात राजकीय मंडळींची मंदियाळी दिसून आली. तर या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. इतर रुग्णालयातून येणारे रुग्ण हे कळवा रुग्णालयात वेळेत दाखल होणे अपेक्षित होते. परंतु रुग्णांना उशिराने या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कदाचित उशीर झाल्याने त्यांना योग्य उपचार मिळाले नसावेत असेही त्यांनी सांगितले. परंतु या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयात ५०० बेडची क्षमता असतांना या ठिकाणी सद्यस्थितीत ५६६ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. त्यामुळे रुग्णालयाचा ताण वाढला आहे. परंतु तिकडे सिव्हिल रुग्णालयात १८६ बेड रिक्त असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातही रुग्णांची परवड होणार नाही, यादृष्टीने जे ट्रस्टचे हॉस्पीटल आहेत, त्याठिकाणच्या बेडची आणि रुग्णालयांची माहिती यापुढे रुग्णांना दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना देखील सुचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मृत रुग्णांच्या नातेवाईकांबरोबर आमच्या संवेदना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.