फेरीवाल्यावर कारवाई करणाऱ्यांवर होणार कारवाई, आयुक्तांनी दिले आश्वासन
By अजित मांडके | Published: October 11, 2023 04:00 PM2023-10-11T16:00:07+5:302023-10-11T16:00:40+5:30
वागळे इस्टेट परिसरातील रोड नं १६ या ठिकाणी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरु होती.
ठाणे : वागळे इस्टेट भागातील पडवळ नगर भागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अतिक्रमण विभागाच्या चालकाला दुखापत झाली आहे. तसेच दोन कर्मचाऱ्यांना गाड्यांच्या काचा फोडल्याने काच लागल्याने दुखापत झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु या घटनेनंतर बुधवारी शिवसेनेच्या दोनही गटाच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन अशा चुकीच्या पध्दतीने आणि महिलांवर खेचून नेत कारवाई करणाºयांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार आयुक्तांनी देखील कारवाईचे आश्वासन दिल्याची माहिती दोनही गटांच्या नेत्यांनी दिली आहे. परंतु पालिकेच्या पथकावर हल्लाच केला नसल्याचा दावा आता फेरीवाल्यांनी देखील केला आहे.
वागळे इस्टेट परिसरातील रोड नं १६ या ठिकाणी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरु होती. कारवाई झाल्यानंतर अतिक्रमण विभागाची वाहने निघाली असताना फेरीवाल्यांकडून अचानक मोठ्या गाडीवर दगड मारण्यात आला. यामध्ये या गाडीची काच फुटली. त्यात दोन कर्मचाºयांना त्या काचा लागल्या तसेच गाडीचा चालक देखील जखमी झाला असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ही घटना घडल्यानंर उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त महेंद्र भोईर यांनी यासंदर्भात वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान अचानक झालेल्या या कारवाईच्या निशेर्धात येथील फेरीवाल्यांनी रात्री ८ नंतर याच जागेवर ठिय्या मांडला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे स्थानिक माजी नगरसेवक संजय घाडीगावकर, शिवसेनेचे राम रेपाळे आणि दिपक वेतकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रात्री १ वाजताच्या सुमारास पुन्हा उपायुक्त शंकर पाटोळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन फेरीवाल्यांचे म्हणने ऐकूण घेतले, त्यानंतर त्यांनी आश्वस्त केल्यानंतर फेरीवाल्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
बुधवारी शिवसेनेच्या दोनही गटाच्या त्याच नेत्यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. यावेळी सुरवातीला संजय घाडीगावकर यांनी निवेदन देत करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला. तसेच महिलांना देखील हाताला धरुन खेचण्यात आल्याचे त्यांनी आयुक्तांच्या निर्दशनास आणून दिले. त्यानंतर काही वेळाने शिवसेनेचे राम रेपाळे आणि दिपक वेतकर यांनी देखील फेरीवाल्यांसोबत आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी फेरीवाल्यांना न्याय द्या, ज्यांच्याकडून अशा पध्दतीने चुकीची कारवाई झाली आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी लावून धरण्यात आली. अखेर आयुक्तांनी देखील तसे आश्वासन दिल्याचे या नेत्यांनी सांगितले.
२ हजारांचा हप्ता घेतो कोण?
फेरीवाल्यांवर कारवाई झाल्यानंतर काही फेरीवाल्यांनी दोन हजारांचा हप्ता देऊनही कारवाई कशासाठी असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे हप्ता घेणारे पालिकेचे ते अधिकारी कोण असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. त्यातही पालिकेने जरी फेरीवाल्यांकडून हल्ला झाल्याचा दावा केला जात असला तरी देखील फेरीवाल्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावत आम्ही हल्ला केला नसल्याचे सांगितले आहे.
२७ पैकी २५ फेरीवाल्यांवर कारवाई
ठाणे महापालिकेच्या प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने वागळे इस्टेट भागातील २७ पैकी २५ फेरीवाल्यांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु अचानक ही कारवाई का झाली असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. असे असले तरी देखील गुरुवार पासून पुन्हा या भागात फेरीवाले आपला व्यवसाय नव्याने सुरु करणार आहेत.