फलक अन् पोस्टरवर कारवाई होणार
By admin | Published: January 3, 2017 05:36 AM2017-01-03T05:36:26+5:302017-01-03T05:36:26+5:30
शहरातील रस्ते आणि पदपथ अडवून विविध राजकीय पक्ष, मंडळे तसेच विविध संस्थांनी बेकायदा फलक उभारले असून त्यामुळे नागरिकांना येथून चालणे कठीण झाले आहे.
ठाणे : शहरातील रस्ते आणि पदपथ अडवून विविध राजकीय पक्ष, मंडळे तसेच विविध संस्थांनी बेकायदा फलक उभारले असून त्यामुळे नागरिकांना येथून चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे या सर्वच फलकांवर तत्काळ कारवाई करावी अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत लावून धरली. त्यानुसार हे फलक तत्काळ काढण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्तांना दिल्या जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
शहराच्या विविध भागातील रस्ते आणि पदपथांवर लोखंडी फ्रेममध्ये फलक उभारले असून यामध्ये राजकीय पक्ष, मंडळे आणि विविध संस्था आघाडीवर आहेत. तसेच अनेक ठिकाणी राजकीय पक्ष तसेच विविध संघटनांनी झेंड्यासाठी खांब उभे केले आहेत. रस्त्यावर उभारलेल्या फलकामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच पदपथाच्या मधोमध ते उभारल्याने त्या ठिकाणाहून नागरिकांना चालणे शक्य होत नाही. यामुळे अपघात होऊ शकतात.
या संदर्भात शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दशरथ पालांडे यांनी असे बेकायदा फलक आणि खांब कोणत्याही पक्षाचे असो सर्व ठिकाणी एकसारखीच कारवाई करावी आणि नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मोकळे करून द्याावेत, अशी मागणी केली. मात्र, ती कोणत्या भागातून सुरू करावी, यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये जुंपली. वागळे इस्टेट भागातील आयटीआय सर्कलपासून ती कारवाई सुरू करावी, अशी विरोधकांनी मागणी लावून धरली.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वागळे इस्टेट परिसरातून ती झाल्यास सत्ताधारी अडचणीत येण्याची शक्यता होती. त्यामुळे सुरुवात इतर ठिकाणापासून करावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशाप्रकारची कारवाई शहरात सुरू आहे. (प्रतिनिधी)