नियम डावलून फटाके फोडल्यास पोलिसांकडून होणार कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: October 31, 2018 11:30 PM2018-10-31T23:30:45+5:302018-10-31T23:30:45+5:30
नियम डावलून कोणी जर रात्री १० वाजेच्या नंतर किंवा भल्या पहाटे फटाके वाजविणार असेल तर आता लहानांपासून मोठयांनाही त्यावर आवर घालावी लागणार आहे. नियमाच्या पलीकडे जाऊन कोणी फटाके वाजविल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणीही नियम डावलून दिवाळीमध्ये फटाके फोडले, तर त्यांच्यावर ध्वनिप्रदूषण कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. असा गुन्हा करणाऱ्यांवर थेट अटकेची कारवाई होणार नाही. पण, फटाके फोडण्याबरोबरच हाणामारीही केली, तर मात्र ती करणार असल्याचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दिवाळीच्या सणामध्ये फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देशभरात काही राज्येवगळता रात्री ८ ते १० ही दोन तासांची वेळ निश्चित केली आहे. या वेळेव्यतिरिक्त जर कोणी फटाके फोडताना आढळले, तर पोलीस त्याच्यावर सरकारमार्फतीने सुमोटो फिर्याद दाखल करतील. याशिवाय, फटाके वाजवणा-यांविरुद्ध जर पोलीस ठाण्यात कोणी तक्रार दाखल केली, तर संबंधितांवरही कारवाई केली जाणार आहे. यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पोलीस अधिका-यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या पातळीवरही या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांतील ३४ पोलीस ठाण्यांची गस्ती पथके तयार केली आहेत. यात काही साध्या वेशात, तर काही नेहमीप्रमाणे वर्दीवर असतील. रात्री १० नंतर कोणीही फटाके वाजवताना आढळले, तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फटाके फोडण्याबरोबरच हाणामारी, शिवीगाळ किंवा गैरप्रकार केल्यास तातडीने अटकेची तरतूद आहे. पण, केवळ फटाके वाजवताना आढळल्यास गुन्हा दाखल केला जाणार असून न्यायालयीन प्रक्रियाही केली जाणार असल्याचे पांडेय यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भल्या पहाटे फटाके वाजविण्याचा मोह आता आवरता घ्यावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘दिवाळीच्या काळात रात्री ८ ते १० या वेळेत फटाके वाजवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. याचे लोकांनी पालन करावे. पोलिसांनी त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे १० नंतर फटाके वाजवणा-यांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनीही न्यायालयाचा मान राखून सहकार्य करणे अपेक्षित आहे.’’
मधुकर पांडेय, सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर