भिवंडीत दाेन संघटनांचे कार्यकर्ते भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:09+5:302021-07-08T04:27:09+5:30
भिवंडी : पालघर व ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जिजाऊ संस्थेच्या भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावातील टेपाचापाडा येथे रविवारी शाखा उद्घाटन ...
भिवंडी : पालघर व ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जिजाऊ संस्थेच्या भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावातील टेपाचापाडा येथे रविवारी शाखा उद्घाटन कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन देवा ग्रुप आणि ग्रामपंचायत सदस्यांनी रविवारी विराेध केला. आमच्या गावात काेणतीही शाखा नाही. काेराेनाच्या संकटात दीडशेपेक्षा जास्त लाेक जमवल्यामुळे ग्रामस्थांच्या जिवाला धाेका निर्माण केल्याचा आराेप केला. त्यावरून दाेन गटांत वाद हाेऊन धक्काबुक्की झाली. तसेच गाड्याही फाेडण्यात आल्या. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा दाेन्ही बाजूंकडून तालुका पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जिजाऊ संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे यांच्या गुन्ह्यांचा पाढा वाचून त्यांना तडीपार करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि ठाणे, पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. सांबरे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सामाजिक शांतता भंग होण्याचा धोका असल्याने त्यांना तडीपार करून ‘मोक्का’ लावण्याची मागणी देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी देवा ग्रुपचे अध्यक्ष सुजित ढोले ऊर्फ पप्या, सचिव तानाजी मोरे, कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरेंद्र गुळवी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.