भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांनी धुडकावले कोरोनाचे नियम

By जितेंद्र कालेकर | Published: August 16, 2021 09:28 PM2021-08-16T21:28:56+5:302021-08-16T21:33:29+5:30

ठाणे शहरात कोरोनामुळे पोलीस आयुक्तांनी मनाई आदेश लागू असतांनाही त्याचे सर्रास मास्कही न घालता भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत मोठी गर्दी करुन उल्लंघन केले. कोरोनासारखा साथीचा आजार पसरविण्यास हयगय तसेच घातकी कृती केल्याचा ठपका ठेवत कोपरी पोलिसांनी भाजपचे ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे यांच्यासह दोन नगरसेवकांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.

Activists flout Corona rules during BJP's Jana Aashirwad Yatra | भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांनी धुडकावले कोरोनाचे नियम

दोन नगरसेवकांसह आयोजकांविरुद्ध गुन्हा

Next
ठळक मुद्दे दोन नगरसेवकांसह आयोजकांविरुद्ध गुन्हाकोपरी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहरात कोरोनामुळे पोलीस आयुक्तांनी मनाई आदेश लागू असतांनाही त्याचे सर्रास मास्कही न घालता भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत मोठी गर्दी करुन उल्लंघन केले. तसेच केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी फटाके लावून एकत्रित जमा होत कोरोनासारखा साथीचा आजार पसरविण्यास हयगय तसेच घातकी कृती केल्याचा ठपका ठेवत कोपरी पोलिसांनी भाजपचे ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे यांच्यासह दोन नगरसेवकांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात कलम १८८, २६९, २७० सह साथीचा रोग कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सुगदरे यांच्यासह भाजपचे ठाणे शहर संघटन सरचिटणीस विलास साठे, नौपाडयातील नगरसेवक संजय वाघुले आणि कोपरीतील नगरसेवक भरत अभिमन्यू तसेच इतरांविरुद्ध हा गुन्हा नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली. १६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ ते ११.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावरील जुना जकात नाका, आनंदनगर, कोपरी, ठाणे पूर्व येथे हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या या तक्रारीमध्ये म्हटले आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांनी ठाणे पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग केला.
* आयोजकांनी नेमकी काय केले-
कार्यक्रमाच्या ठिकाणी विनापरवाना स्टेज बांधले. त्याठिकाणी वाद्य आणि गाणी वाजवून लोकांना आकर्षित करुन मोठया प्रमाणात एकत्र जमा केले. कोविडचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असतांनाही केंद्रीय राज्यमंत्री हे कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर फटाके वाजवित त्यांचे स्वागत केले. मर्यादेपेक्षा जास्त पदाधिकारी कार्यकर्ते स्टेजवर एकत्र जमले. त्यातील काहींनी मास्कचा वापरही केला नव्हता. कोरोनाचा संसर्ग पसरविण्यास हयगय आणि घातकी कृती केल्याचा ठपका जन आशीर्वाद रॅलीचे आयोजक सुगदरे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी ठेवला आहे. पोलीस निरीक्षक जी. ए. वायकुळे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Activists flout Corona rules during BJP's Jana Aashirwad Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.