घराणेशाहीमुळे कार्यकर्ते दुखावले
By admin | Published: January 9, 2017 06:09 AM2017-01-09T06:09:10+5:302017-01-09T06:09:10+5:30
शहरात दबंग नेत्यांच्या घराणेशाहीने कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. निवडणूक व विविध कार्यक्रमांत आपला वापर करून घेतला जातो,
सदानंद नाईक / उल्हासनगर
शहरात दबंग नेत्यांच्या घराणेशाहीने कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. निवडणूक व विविध कार्यक्रमांत आपला वापर करून घेतला जातो, असा साक्षात्कार झाल्याने थेट जिल्हास्तरीय नेत्यांकडे तिकिटांची मागणी केली आहे. दबंग नेत्यांनी पुढच्या पिढीच्या सोयीसाठी राजकीय ताकद पणाला लावून एकाऐवजी दोन जागेची मागणी केल्याने नेतेही धर्मसंकटात सापडले आहेत.
उल्हासनगरमधील राजकारणात घराणेशाही निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे निवडून आल्यानंतरही खऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याऐवजी पुढच्या पिढीची सोय दबंग नेत्यांनी चालवली आहे. या प्रकाराने निष्ठावंत कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट दिले नाहीतर बंडखोरी होण्याची शक्यता असून आम्ही फक्त झेंडा उचलून यांची कामे करायची का, असा प्रश्न विचारला जात आहे. कार्यकर्त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीने दबंग नेते संतापले असून निवडणुकीदरम्यान मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पप्पू कलानी व आमदार ज्योती कलानी यांनी ओमी यांना राजकारणाच्या पटलावर आणले. ओमी यांनी टीम निर्माण करून राष्ट्रवादीला आव्हान देत स्वत: इतर पक्षांसोबत वाटाघाटी सुरू केल्या आहेत.
माजी आमदार कुमार आयलानी यांनी मुलगा धीरज याला युवा नेता म्हणून पुढे केले. त्याचप्रमाणे माजी उपमहापौर विनोद ठाकूर यांनी धीरज ठाकूर यांना पुढे करून ते युवासेनेचे युवा अधिकारी आहेत. भाजपाचे माजी अध्यक्ष लाल पंजाबी यांनीही मुलाला उमेदवारी देण्यासाठी राजकीय ताकद पणाला लावली आहे. शिवसेनेतील दबंग नेते राजेंद्रसिंग भुल्लर यांनीही मुलाला राजकारणात आणले आहे.
या नेत्यांनी लावली ताकद पणाला
माजी महापौर लीलाबाई अशान, विजय पाटील, परशुराम पाटील, विनोद तलरेजा, मोहन गाडो, जया साधवानी, अंजली साळवे, सुरेश जाधव, दिलीप गायकवाड, नरेंद्र राजाणी, नाना बागुल, महादेव सोनावणे, जमनुदास पुरस्वानी, गोदू कृष्णानी यांनी पुढच्या पिढीला राजकारणात चंचूप्रवेश मिळण्यासाठी ताकद लावली आहे. पक्ष नेतृत्वाने वारंवार निवडून येणाऱ्या नगरसेवकांना घरी बसवून त्यांच्या जागी निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी द्यावी, या मागणीने जोर पकडला आहे.