शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात होऊ दे चर्चा कार्यक्रम रोखला
By अजित मांडके | Published: October 7, 2023 09:41 PM2023-10-07T21:41:21+5:302023-10-07T21:42:59+5:30
हाजुरीत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची,पोलिसानी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवला.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : सध्या ठाण्यात ठाकरे गटातर्फे ठिकठिकाणी होऊ दे चर्चा कार्यक्रमाच आयोजन करण्यात येत आहे. यात चौका चौकांत ठाकरे गटाचे कार्यकर्ते चौकसभा घेत सरकारवर निशाणा साधत आहेत. ठाण्यातील हाजुरी या भागात ठाकरे गटाचे कार्यकर्ते येताच स्थानिक नागरिक आणि शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला. यातून दोन्ही गट आमने समाने आल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद मिटविला.
ठाकरे गटातर्फे ठिकठिकाणी होऊ दे चर्चा कार्यक्रमाच आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार ठाण्यातील हाजुरी भागात सांयकाळी हा कार्यक्रम घेतला असता त्याला विरोध करण्यात आला. यात स्थानिक राहिवाशांचा भरणा अधिक होता. हाजुरीत राजकीय वातावरणात बिघडवू नका असे म्हणत या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला. मात्र ठाकरे गटाचे कार्यकर्ते ऐकण्यास तयार नव्हते,तेव्हा काही काळ आपापसात जोरदार बाचाबाची होऊन वाद झाला. दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू झाली वाद वाढतो लक्षात येताच वेळीच पोलिसानी त्यात हस्तक्षेप करून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना हाजुरीत कार्यक्रम न करण्याचा सूचना दिल्या. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथून गेल्यानंतर तणाव निवळला.
स्थानिक रहिवासी यांनीच या कार्यक्रमाला आक्षेप घेतल्याने कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही ठाकरे गटाला हा कार्यक्रम हाजुरीत करू नका अशा सूचना दिल्याचे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी सांगितले. दरम्यान सध्या तरी वाद तात्काळ मिटला असून परिस्थिती सामान्य असल्याची माहिती पोलिसानी दिली.