झोपडपट्टीतील मुलेही उन्हाळी शिबिरात , ठाणे सिटीझन फाउंडेशनचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:46 AM2018-05-07T06:46:37+5:302018-05-07T06:46:37+5:30
अनेक मुले हजारो रुपये शुल्क भरून उन्हाळी शिबिरात दाखल झाली आहेत. झोपडपट्टी वस्तीतील मुलांना मात्र पैशांअभावी शिबिरात सहभागी होता येत नाही.
ठाणे : अनेक मुले हजारो रुपये शुल्क भरून उन्हाळी शिबिरात दाखल झाली आहेत. झोपडपट्टी वस्तीतील मुलांना मात्र पैशांअभावी शिबिरात सहभागी होता येत नाही. अशा मुलांसाठी ठाणे सिटीझन फाउंडेशनने पाचदिवसीय मोफत उन्हाळी शिबिर उपक्रम हाती घेतला असून त्याचा सुमारे १५० मुले आनंद लुटत आहेत.
सुट्यांचे दिवस सुरू असून सर्वत्र उन्हाळी शिबिरांचे पीक आले आहे. शिबिराचे आयोजक त्याला चांगले शुल्कही आकारतात. हे शुल्क भरणे सामान्यांना, झोपडपट्टीतील सगळ्याच मुलांना शक्य होत नाही. हे ओळखून ठाणे सिटीझन फाउंडेशन, महाराष्टÑ गो ग्रीन फाऊंडेशन आणि कॅसबर डान्स अॅकॅडमी यांनी संयुक्त विद्यमाने झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी उन्हाळी शिबिर आयोजिले. पहिल्या टप्प्यातील या शिबिरात जानकादेवीनगर येथील मुलांना सहभागी करून घेण्यात आले असून लिटिल फ्लॉवर हायस्कूल येथे हे शिबिर भरते. मुलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून ती आवडीने सहभागी झाली आहेत. महाराष्टÑदिनी या शिबिराचे उद्घाटन ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जोशी यांनी मुलांच्या उत्साहाचे कौतुक करत फाउंडेशनच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ५ ते १५ वयोगटांतील एकूण सुमारे १५० मुले सहभागी झाली आहेत. शिबिरात मुलांना नृत्य, योगा, संवादकौशल्य, वक्तृत्व, कला, क्रीडा याचे प्रशिक्षण दिले जात आहे. मुलांना व्यक्तिमत्त्व विकासाचेही धडे दिले जात आहे. याचबरोबर झोपडपट्टीतील मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे. आपापली वसाहत स्वच्छ राहण्यासाठी सुरुवात मुलांनी स्वत:पासून, घरापासून केली पाहिजे. या उद्देशाने त्यांना ओला-सुका कचरा वर्गीकरणाचे धडे शिबिरात दिले गेले. अनेक मुलांनी कचरा इतरत्र न फेकता कचरा डब्यातच साठवण्याची प्रतिज्ञा घेतली. तसेच ही मुले रविवारी आपापल्या परिसरात रॅली काढून स्वच्छेतबाबत जागृती करणार आहेत.
शनिवारी या शिबिराचा समारोप होणार असून पुढील दिवसांत इतर झोपडपट्टी वसाहतीतील मुलांसाठी अशाच प्रकारची शिबिरे आयोजण्याचा ठाणे सिटीझन फाउंडेशनचा मानस आहे.