वेबसिरीजमध्ये निवड झाल्याचे सांगून कळव्यातील अभिनेत्रीची आर्थिक फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 10:30 PM2022-02-25T22:30:49+5:302022-02-27T14:28:26+5:30

कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा;चित्रीकरणाच्या नावाखाली उकळले पैसे

actress cheated financially by claiming to have been selected in the web series | वेबसिरीजमध्ये निवड झाल्याचे सांगून कळव्यातील अभिनेत्रीची आर्थिक फसवणूक

वेबसिरीजमध्ये निवड झाल्याचे सांगून कळव्यातील अभिनेत्रीची आर्थिक फसवणूक

Next

ठाणे : वेबसिरीजमध्ये अभिनेत्री म्हणून निवड झाल्याचे सांगून चित्रीकरणासाठी हैद्राबाद येथे जाण्यासाठी दोन भामट्यांनी कळव्यातील एका मराठी अभिनेत्रीकडून विमानाच्या तिकिटाचे ३० हजार ३६८ रुपये अलिकडेच उकळले. नंतर तिला विमानाचे तिकीट किंवा पैसेही परत न करता या भामट्यानी फसवणूक केली. तिने कळवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये भूमिका करणारी ही अभिनेत्री ठाण्यातील खारेगावमध्ये वास्तव्याला आहे. तिला ८ डिसेंबर २०२१ रोजी मोबाईल तसेच ई-मेलद्वारे अनिकेत कुमार या भामट्याने एका वेबसिरीजसाठी निवड झाल्याची बतावणी केली. वेबसिरीजचे चित्रीकरण मुंबई आणि हैद्राबादला होणार असल्याचाही दावा केला. त्यासाठी लागणारी कागदपत्रेही त्याच्याकडे व्हॉटसॲपद्वारे तिने जमा केली. लवकरच करारासाठी मुंबईला टेलिफिल्मसच्या कार्यालयात बोलविले जाईल, असेही सांगण्यात आले. कोरोनामुळे चित्रीकरणाच्या तारखा लांबणीवर पडल्या असून करारासाठी हैद्राबादला जावे लागेल असेही तिला सांगितले. काही दिवसांनी १ फेब्रुवारी २०२२ रोजी Casting Director अशी ओळख सांगणाऱ्या शिव नामक व्यक्तीचाही तिला फोन आला. त्याने विमान प्रवासाचा खर्च तुम्हाला करावा लागेल. हैद्राबादला आल्यानंतर खर्च तुम्हाला लगेच दिला जाईल. तसेच कुटुंबातील व्यक्तीला सोबत आणू शकता. हा खर्चही दिला जाईल, अशीही बतावणी केली. परंतु, विमानाचे तिकीट प्रोमोकोड वापरून काढल्यावरच तिकिटाचे पैसे मिळतील, असेही या अभिनेत्रीला सांगण्यात आले. त्यानुसार तिने तिचे आणि तिच्या कुटुंबातील अन्य एका व्यक्तीचे अशा दोघांचे प्रोमोकोड वापरून १० फेब्रुवारी २०२२ रोजीचे मुंबई ते हैद्राबाद जाणाऱ्या विमानाचे जाण्याचे आणि येण्याचेही तिकीट आरक्षित केले. ते बुक होत नसल्याने तिने याबाबत शिवकडे विचारणा केली. त्याने ऑनलाईन पैसे दिल्यास तुम्हाला तिकीट बुक झाल्याचा ई-मेल येईल, असा दावा केला. त्यामुळे आपल्याला तिकीट मिळेल, या आशेपोटी तिने ३० हजार ६३८ रुपये ऑनलाईन दिले. प्रोमोकोडमध्ये काहीतरी समस्या असून रात्रीपर्यंत तिकीट कन्फर्म होईल, अशीही शिवने सांगितले. तिकीट कन्फर्म झालीच नाहीत. नंतर वारंवार संपर्क करूनही दाेघांनीही तिला प्रतिसाद दिला नाही. तिकिटाचे पैसे न भरल्याने तिकीट रद्द झाल्याची माहिती विमान कंपनीच्या ग्राहक क्रमांकावरून अभिनेत्रीला मिळाली. दोघांनीही आपल्याकडून पैसे उकळल्याची तक्रार २३ फेब्रुवारी रोजी तिने कळवा पोलीस ठाण्यात केली.

 

Web Title: actress cheated financially by claiming to have been selected in the web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.