ठाण्यातील दोन विशेष श्वान कॅनडात: अभिनेत्री लैला खान यांनी घेतले दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 09:27 PM2018-10-14T21:27:59+5:302018-10-14T21:37:15+5:30
अपघातग्रस्त प्राण्यांना बऱ्याचदा त्यांच्यासाठी काम करणाºया सामाजिक संस्थेमध्ये सोडून जातात. पण, त्यांना स्विकारण्यास कोणीही पुढे येत नाही. त्यातच अशाप्रकारे या प्राण्यांना दत्तक घेणे ही मोठी गोष्ट आहे.
ठाणे : ठाणे एसपीएसए या सामाजिक संस्थेच्या रुग्णालयात वास्तव्यास असलेल्या भारतीय जातीच्या दोन विशेष मादी श्वानांना कॅनडातील प्रसिद्ध अभिनेत्री लैला खान यांनी दत्तक घेतले आहे. त्यापैकी एक श्वान एका डोळ्याने अंध, तर दुसरीला दोन पायांनी अपंगत्व आले आहे. रविवारी दुपारी दोन्ही श्वान कॅनडात दाखल झाले. दोन वर्षांपूर्वी लैला खान यांनी दोन श्वानांना याच संस्थेतून दत्तक घेतले होते, अशी माहिती तेथील पशुवैद्यकीय डॉक्टर सुहास राणे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
फिरंगी आणि एन्जल अशी या दत्तक श्वानांची नावे आहेत. फिरंगी ही अवघी आठ महिन्यांची आहे. ती एक महिन्याची असताना, डोक्याला गंभीर जखम झाल्यानंतर तिला या संस्थेत आणले होते. या जखमेमुळे तिच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. तेव्हापासून ती या संस्थेची एक सदस्य होऊन बसली आहे. एन्जल चार वर्षांची आहे. ती दोन वर्षांची असताना रेल्वे अपघातात जखमी झाली होती. त्यावेळी तिला पुढचे दोन पाय गमवावे लागले होते. ती सुद्धा तेव्हापासून या संस्थेत वास्तव्यास आहे. दरम्यान, लैला खान यांनी संस्थेचे सदस्य मुकेश पटेल यांच्या मदतीने फिरंगी आणि एन्जल हे दोन्ही श्वान दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दोन्ही श्वान शनिवारी दुपारी कॅनडासाठी रवाना झाल्या. रविवारी दुपारी त्या कॅनडाला पोहोचल्या. खान यांनी दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या दोन श्वानांना दत्तक घेतले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
--------------
३३ अंशातून ११ अंश तापमानात दाखल
फिरंगी आणि एन्जल आतापर्यंत ३३ अंश तापमानात वावरत होत्या. आता कॅनडातील ११ अंश तापमानात त्या दाखल झाल्या आहेत. हे तापमान त्यांना साजेसे आहे. तेथील तापमान कमी असले तरी, त्याचा त्या श्वानांवर परिणाम होणार नाही. त्या तापमानाशी लवकरच जुळवून घेतील, असे संस्थेच्या डॉक्टरांनी सांगितले.
---------------------
अभिनेत्री लैला खान यांनी समाजसेवेच्या भावनेतून विशेष श्वान दत्तक घेतले आहेत. अशाच प्रकारे ठाणेकरांनीही पुढे येऊन प्राणी दत्तक घ्यावेत.
- डॉ. सुहास राणे, प्राणी-पशू डॉक्टर, ठाणे एसपीएसए
.............