अभिनेत्रीला रिव्हॉल्व्हर दाखवून दिली धमकी: भूमीका देण्याच्या नावाखाली विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 10:20 PM2021-07-30T22:20:35+5:302021-07-30T23:58:11+5:30
चित्रपटात दुय्यम मुख्य भूमिका देण्याच्या नावाखाली मीरा रोड येथील एका २३ वर्षीय अभिनेत्रीचा विनयभंग करीत कास्टींग काऊच करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कथित निर्माता राहूल तिवारी (३०, रा. गोरेगाव, मुंबई) याच्यासह चौघांना कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
ठाणे: चित्रपटात दुय्यम मुख्य भूमिका देण्याच्या नावाखाली मीरा रोड येथील एका २३ वर्षीय अभिनेत्रीचा विनयभंग करीत कास्टींग काऊच करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कथित निर्माता राहूल तिवारी (३०, रा. गोरेगाव, मुंबई) याच्यासह चौघांना कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. या चौघांनाही ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले ंआहेत.
तिवारी तसेच बिरालाल यादव (३५, रा. कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे), राकेश यादव (३०, रा. गोरेगाव, मुंबई) आणि कांचन यादव (३०, रा. गोरेगाव, मुंबई) या चौघांनीही आपसात संगनमत करुन पिडित अभिनेत्रीला चित्रपटात मुख्य भूमीका देण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी तिला ठाण्यातील कासारवडवली भागात २९ जुलै रोजी सायंकाळी आणले होते. नंतर तिला लखनऊ येथून येणाºया निर्मात्यांना खुष करावे लागेल, असे तिवारी याने सांगितले. या निर्मात्यांना आॅफ स्क्रीन कॉम्प्रमाईज करावे लागेल, असेही त्याने सांगितले. नंतर सेकंड लीडचा रोल देतो, असे सांगून तिला विश्वासात घेतले. त्याच दरम्यान, तिला कारमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवित धमकी देऊन तिचा विनयभंग केला. दरम्यान, या प्रकाराची तिने आधीच कुटूंबीयांना कल्पना दिलेली असल्याने महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे पदमनाभ राणे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकाराचा भंडाभोड केला. या चौघांनाही मनसे ‘स्टाईल’ने प्रसाद दिल्यानंतर त्यांना कासारवडवली पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर या चौघांविरुद्ध विनयभंगासह धमकी देणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. यातील राहूल, बिरालाल आणि राकेश या तिघांना ३० जुलै रोजी पहाटे १ वाजता अटक झाली. तर त्यांची महिला साथीदार कांचन हिला सकाळी १०.३० वाजता पोलिसांनी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. केसरे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.