‘मतदारयादी ‘आधार’ला जोडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:04 AM2017-08-04T02:04:15+5:302017-08-04T02:04:15+5:30
मुरबाड मतदारसंघातील मुरबाड, कल्याण ग्रामीण आणि बदलापूर शहर या तिन्ही ठिकाणी जे मतदार आहेत त्यातील अनेक मतदारांची नावे ही दोन ते चार वेळा आली आहेत.
बदलापूर : मुरबाड मतदारसंघातील मुरबाड, कल्याण ग्रामीण आणि बदलापूर शहर या तिन्ही ठिकाणी जे मतदार आहेत त्यातील अनेक मतदारांची नावे ही दोन ते चार वेळा आली आहेत. दुबार मतदार आणि काही बोगस मतदारांचा आकडा पाहिल्यास सरासरी २५ हजाराहून अधिक आहे. या मतदारांना मतदारयादीतून वगळण्याची प्रक्रीया लांबणीवर पडत आहे. त्यामुळे आता मतदारयादी ही आधार कार्डसोबत जोडण्याची मागणी नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांनी केली
आहे.
मुरबाड मतदारसंघातील मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप दामले यांनी केला आहे. मतदारसंघातील एका व्यक्तीचे नाव शोधल्यावर त्या व्यक्तीचे त्याच मतदारसंघात इतरत्रही नाव सापडत आहेत. काही नावे असे आहेत की त्यांची याच मतदारसंघात तीन ते चार ठिकाणी नावे आहेत.
बाहेरील मतदारांचीही नावे मुरबाड मतदारसंघात टाकण्यात आली आहेत. हे बोगस मतदार आणि दुबार नावे असलेल्या मतदारांना वगळण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. मतदारयादीतील घोळ हा वाढत असून या मतदारयादीतील घोळ कमी करण्यासाठी मतदारयादी थेट आधारकार्डाशी जोडण्याची मागणी दामले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाचे काम सुरू असले तरी मतदारांना आधार सोबतत जोडणे सक्तीचे करण्याची गरज आहे. यामुळे बोगस मतदान होणार नाही असे ते म्हणाले. मतदारयादीमध्ये फोटो बंधनकारक केल्यावर ९० टक्के फोटोचे काम झालेले आहे.