कोरोना संसर्गाच्या काळात डॉक्टरांमध्ये व्यसनाधीनता लागली वाढीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 11:33 PM2021-04-27T23:33:11+5:302021-04-27T23:33:21+5:30

डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निरीक्षण

Addiction among doctors increased during the period of corona infection | कोरोना संसर्गाच्या काळात डॉक्टरांमध्ये व्यसनाधीनता लागली वाढीला

कोरोना संसर्गाच्या काळात डॉक्टरांमध्ये व्यसनाधीनता लागली वाढीला

Next

ठाणे : कोविडच्या सेवेत नसणाऱ्या, इतर प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रॅक्टिसवर या काळात माेठा परिणाम झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्जरी बंद आहेत, बालरोगतज्ज्ञांकडे पेशंट येत नाहीत; त्यामुळे या डाॅक्टरांची प्रॅक्टिस ३० ते ४० टक्क्यांवर आली आहे. प्रॅक्टिस सोडून १५ ते २० वर्षांत इतर काही केले नसल्याने या डॉक्टरांना या काळात काय करावे, हे समजेनासे झाले आहे. त्यामुळे या डॉक्टरांतील व्यसनाधीनता वाढीला लागली आहे, असे निरीक्षण आय. पी. एच. अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थचे विश्वस्त, मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी नाेंदवले आहे. 

सध्याच्या स्थितीत वैद्यकीय सेवा देणारे डाॅक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचारी यांच्यावर दाेन प्रकारचे ताण आहेत. याबद्दल डाॅ. नाडकर्णी म्हणाले की, प्रत्यक्ष काेविड सेवेत असणाऱ्यांवरील ताण वेगळे आहेत. त्यांना दरराेज मृत्यूचे तांडव अनुभवावे लागते. राेज मृत्यू प्रमाणपत्रे बनवावी लागतात. नातेवाइकांची समजूत काढावी लागते. रुग्णालयात बेड नसेल तर दुसरीकडे जा असे सांगण्यात वेळ खर्ची घालावा लागताे. 

कोविडचा पैलू आणि कोविडकाळाचा पैलू असे दोन पैलू आहेत. आता जे इंटर्न आणि तरुण डॉक्टर आहेत, त्यांनाही या काळात काम करावे लागणार आहे. तरुण डॉक्टरांना ताण घेण्याची सवय नाही. त्यामुळे पुढच्या काळात त्यांचा वेगळा प्रश्न येणार आहे. आरोग्यसेवेत काम करणाऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यांना यावर वाट काढून दिली पाहिजे. म्हणूनच आयपीएचने ‘दिलासा’ ही संकल्पना मांडली असल्याचे डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले.

राजकीय दबाव

बेड, इंजेक्शन, ऑक्सिजन यांचा तुटवडा यामुळे वैद्यकीय सेवा देताना ताण सहन करावा लागताे. त्याच वेळी प्रशासन आणि राजकारण्यांकडून येणारा दबाव अशा बिकट परिस्थितीत सेवा बजवावी लागत आहे. दुसरीकडे कितीही चांगले काम केले तरी आपले काही चुकले नाही ना, अशी अपराधाची भावनाही हाेत असते. 

Web Title: Addiction among doctors increased during the period of corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.