शहर विकास विभागासह मालमत्ता, बांधकाम विभागाचेही उत्पन्न घटले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 01:04 AM2019-12-08T01:04:12+5:302019-12-08T01:04:43+5:30
ठाणे महानगरपालिका प्रशासनापुढे मोठा पेच
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागात विकासकांकडून दाखल करण्यात येणाऱ्या विकास प्रस्तावांची संख्या यावर्षी वाढली असली, तरी त्यात दोन मोठ्या प्रस्तावांमुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मात्र, उर्वरित लक्ष्य कसे पूर्ण करायचे, असा पेच या विभागाला पडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३८४.७० कोटींनी उत्पन्न वाढले असून यामध्ये सर्वाधिक १९९ कोटींचा शहर विकास विभागाचा वाटा आहे. त्यातही दोन मोठ्या विकास प्रस्तावांमुळे ही वाढ फुगली आहे. शहर विकास विभागाची ही परिस्थिती असताना दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम, जाहिरात, स्थावर मालमत्ता आणि पाणीपुरवठा विभागाचीही वसुली मात्र समाधानकारक नसल्याचे समोर आले आहे.
बांधकाम व्यवसाय क्षेत्रात काही प्रमाणात मंदीचे वातावरण असले तरी, ठाण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत विकास प्रस्तावांची संख्या वाढली आहे. यामध्ये दोन मोठे प्रस्ताव आल्याने शहर विकास विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. परंतु, त्यानंतर नवीन कोणतेही प्रस्ताव न आल्याने निर्धारित कालावधीत उत्पन्न कसे वाढवायचे, असा पेच या विभागाला पडला आहे, हीच परिस्थिती पालिकेच्या इतर विभागांचीदेखील आहे.
जाहिरात, सार्वजनिक बांधकाम आणि विशेषकरून स्थावर मालमत्ता विभागाचे उत्पन्न तर अक्षरश: घटले असून वसुलीबाबत या विभागाचे उदासीन धोरण असल्याचे उघड झाले आहे. स्थावर मालमत्ता विभागाच्या मालकीची चार हजार रेंटलची घरे असून यापैकी तीन हजार घरे ही भाडेतत्त्वावर दिली आहेत.
इतर मालमत्तादेखील इतर शासकीय संस्थांना देण्यात आल्या असून त्यांची वसुलीदेखील पाच कोटींच्या घरात असून या विभागाचा सर्व स्टाफ हा निवडणुकीच्या कामात व्यस्त होता, त्यामुळे वसुली होऊ शकली नाही. मात्र, येत्या मार्चपर्यंत सर्व वसुली होणार असल्याचे या विभागाने स्पष्ट केले आहे.