शिक्षकांव्यतिरिक्त उमेदवारही अर्ज भरू शकतो!
By admin | Published: January 13, 2017 06:48 AM2017-01-13T06:48:31+5:302017-01-13T06:48:31+5:30
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा दुसरा दिवस आहे.
सुरेश लोखंडे / ठाणे
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा दुसरा दिवस आहे. या आमदारकीसाठी ३ फेब्रुवारीरोजी मतदान होणार आहे. यासाठी इच्छुक असलेला उमेदवार हा शिक्षकच असावा, अशी कोणत्याही प्रकारची अट नाही. यामुळे शिक्षकांव्यतिरिक्त इतर उमेदवारदेखील उमेदवारी अर्ज भरू शकतो, असे येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी सांगितले.
या निवडणुकीसाठी १७ जानेवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र उमेदवारांना भरता येणार आहे. कोकण विभागीय आयुक्त या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असल्यामुळे बेलापूर येथील त्यांच्या कार्यालयात इच्छुकांना उमेदवारी दाखल करायची आहे. मात्र, गुरुवारी दुसऱ्या दिवशीदेखील उमेदवारी एकही अर्ज दाखल झालेला नाही. १४ जानेवारीच्या मकरसंक्रांतीनंतरच उमेदवारी अर्ज दाखल होतील, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. यासाठी शिक्षक असलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी अर्ज भरता येतो, असा गैरसमज पसरवला जात असल्याची चर्चा आहे. यास अनुसरून मुकादम यांना विचारणा केली असता कोणत्याही पात्र व्यक्तीस नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल, असे सूतोवाच केले.
माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय आदींमधील शिक्षक, प्राध्यापक या निवडणुकीच्या मतदानासाठी पात्र आहेत. या निवडणुकीसाठी ३७ हजार ६४४ मतदार आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील १५ हजार ७६३ मतदारांचा समावेश आहे. या मतदारांची अधिकृत मतदारयादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसीलदार, महापालिका, नगरपालिका आदी सरकारी कार्यालयांच्या आवारात सर्वांना पाहण्यासाठी ठेवल्या आहेत. कोकण विभागात ९८ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक २८, तर त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात २१ मतदान केंद्रे आहेत. पालघरला १३, रत्नागिरीला १७ आणि सिंधुदुर्गसाठी १९ मतदान केंदे्र घोषित केली आहेत.