पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त महिन्याला एखादे पुस्तक तरी वाचा : डॉ. विजया वाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 04:35 PM2019-02-02T16:35:49+5:302019-02-02T16:37:33+5:30
पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त महिन्याला एखादे पुस्तक तरी वाचा असा सल्ला डॉ. विजया वाड यांनी विद्यार्थ्यांना दिला.
ठाणे: पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त महिन्याला एखादे पुस्तक तरी वाचा, शाळेत असणाऱ्या ग्रंथालयाचा उपयोग करा, त्यातील विविध विषयांवरची पुस्तके वाचा असे आवाहन ज्येष्ठ बालसाहित्यिकाडॉ. विजया वाड यांनी विद्यार्थ्यांना केले. ज्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुसत्के वाचली, त्यांचे फोटो फलकावर लावा त्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल अशी सूचना त्यांनी शिक्षिकांनाही केली.
पाणिनी फाऊंडेशन आयोजित कळवा येथील ज्ञानप्रसारिणी शाळेत शनिवारी पहिले अ. भा. बालसाहित्य संमेलन पार पडले. सकाळच्या सत्रात डॉ. वाड यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. डॉ. वाड यांनी विद्यार्थ्यांकडून ‘एक पुस्तक वाचू बाबा दोन पुस्तके वाचू’ ही कविता म्हणवून घेतली. संमेलनाची सुरूवात ग्रंथदिंडीने झाली. ही दिंडी शाळेच्या आवारात काढण्यात आली होती. पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी या दिंडीचे भोई झाले होते. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. प्रा. बाळासाहेब खोल्लम म्हणाले, बालकवितांनी मुलांचे भावविश्व समृद्ध व्हायला मदत होते, मुलांचे कविसंमेलन हे या संमेलनातील विशेष बाब होती. कवयित्री सुनिला मोहनदास यांनी हे संमेलन पाहून माझ्या शाळेचे दिवस आठवले अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. टीव्हीपेक्षा पुस्तकांतील वाड्.मय हे मोठे असते, त्यामुळे पुस्तकांशी गोडी करा, स्पर्धांमध्ये सहभागी व्हा, बाह्यरंगामुळे नाही तर अंतरंगामुळे आयुष्याचे चित्र सुंदर होत जाते, आळसपणा सोडा म्हणजे तुम्हाला नक्की यश मिळेल असा सल्ला बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना दिला. पाणिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा संगीता चव्हाण म्हणाल्या, वाचनाची आवड जोपासा कारण वाचन हेच आपल्याला घडवते. भूमिका शिंदे या विद्याथीर्नीने संमेलनाचे सुत्रसंचालन केले.
------------------------------------
फोटो : बालसाहित्य संमेलन