सलग सुट्ट्यांमुळे एसटीच्या अतिरिक्त बसफेऱ्या; लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडणार बस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 03:51 PM2022-04-14T15:51:29+5:302022-04-14T15:55:02+5:30
ठाणे : मागील काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटीला तोटा सहन करावा लागत होता. अशातच न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कामावर ...
ठाणे : मागील काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटीला तोटा सहन करावा लागत होता. अशातच न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असताना, दुसरीकडे १४ ते १७ एप्रिलदरम्यान सलग चार दिवस सुट्ट्या आल्यामुळे एसटी महामंडळ चाकरमान्यांना सेवा देण्यासाठी पुन्हा सरसावले आहे. त्यानुसार बेळगाव, कोल्हापूर, कराड, सातारा, दहिवडी, स्वारगेट, नगर, आळेफाटा आदी ठिकाणी अतिरिक्त बसफेऱ्यांचे वंदना आणि कल्याण बसस्थानकातून नियोजन करण्यात आले आहे.
दिवाळी, होळी, गणेशोत्सव आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाकडे जाण्यासाठी चाकरमानी हा एसटीकडे धाव घेत असतो. मात्र, दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आधीच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एसटी पुन्हा रुळावर येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच विलीनीकरणाच्या मुद्द्यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले. त्यामुळे मागील सहा ते सात महिन्यापांसून एसटीची धाव अधिकच मंदावली. त्यामुळे आर्थिक स्थिती खालावली आहे. मुंबई उच्च न्यायलयाने दिलेल्या निकालानंतर कर्मचारी हजर होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच १४ एप्रिल ते १७ एप्रिल अशा सलग चार दिवस सुट्ट्या आल्यामुळे एसटीने चाकरमान्यांना सेवा देण्यासाठी पुन्हा पुढाकार घेतला आहे.
या मार्गावर धावणार जादा बस
- ठाणे शहरातील वंदना स्थानकातून ठाणे - बेळगाव, ठाणे - कोल्हापूर, ठाणे - कराड, सातारा, दहिवडी, स्वारगेट, भिवंडी-ठाणे-कराड, भिवंडी-ठाणे-स्वारगेट, वाडा - स्वारगेट या मार्गावर अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
- कल्याण स्थानकातून कल्याण - नगर, भिवंडी - कल्याण, नगर, वाडा - नगर, कल्याण - आळेफाटा, कल्याण - स्वारगेट, कल्याण - श्रीरामपूर, कल्याण - डिंबा, कल्याण - नाशिक (व्हाया जव्हार-त्र्यंबकेश्वर), विठ्ठलवाडी - कल्याण - भगवानगड, विठ्ठलवाडी - कल्याण - इस्लामपूर या मार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन केल्याची माहिती ठाणे विभागीय नियंत्रक विनोद भालेराव यांनी दिली.