अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:41 AM2021-04-08T04:41:00+5:302021-04-08T04:41:00+5:30
उल्हासनगर : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांच्यासह एका उपायुक्तांना कोरोना झाला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ...
उल्हासनगर : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांच्यासह एका उपायुक्तांना कोरोना झाला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी केले आहे. आयुक्तांच्या गैरहजेरीत आयुक्तपदाचा प्रभारी पदभार सांभाळताना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती जुईकर यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेत वर्ग एक व दोनची ९० टक्के पदे रिक्त असून कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे वर्ग एक व दोनच्या पदाचा पदभार दिला. ऐन कोरोना महामारीत आयुक्त सुटीवर गेल्यानंतर अतिरिक्त आयुक्त जुईकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. त्याचवेळी भंडार, परिवहन व लेखा विभागाचे उपायुक्त यांनाही कोरोना झाला. जुईकर यांनीही संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन केले.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता, विभागीय अभियंता यांनाही संसर्ग झाल्याने इतर कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे आदींनी लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी केंद्रावर लक्ष ठेऊन आहेत. नागरिक स्वतःहून लस घेण्यासाठी केंद्रावर सकाळी सातपासून रांगेत उभे राहत आहेत. कोरोना चाचण्या वाढविल्याने रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती डॉ. पगारे यांनी दिली.