कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना ८ लाखांची लाच घेताना पकडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 04:54 PM2018-06-13T16:54:54+5:302018-06-13T16:54:54+5:30
८ लाखांचा हफ्ता आपल्याच कार्यालयात घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना ८ लाखांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नये यासाठी संजय घरत यांनी संबंधिताकडे ४२ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती ३५ लाख रुपये देण्याचे निश्चित ठरले. त्यापैकी पहिला ८ लाखांचा हफ्ता आपल्याच कार्यालयात घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुपारी ३ च्या सुमारास रंगेहात अटक केली.
दरम्यान, नेहमीच चर्चेत राहणारे आणि वादग्रस्त अधिकारी अशी प्रतिमा असणाऱ्या घरत यांना पकडल्याची बातमी वाऱ्यासारखी महापालिकेत तसेच राजकीय वर्तुळात पसरली. घरत हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील जुने अधिकारी समजले जातात. त्यामूळे महापालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये पत्रकार, राजकारणी आणि इतरांची मोठी गर्दी झाली होती.