अतिरिक्त आयुक्त संजय घरत निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 03:04 AM2018-06-20T03:04:11+5:302018-06-20T03:04:11+5:30
बेकायदा बांधकामप्रकरणी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटकेत असलेले अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि लिपिक ललित आमरे यांना मंगळवारी केडीएमसीच्या सेवेतून निलंबित करण्यात आले.
कल्याण : बेकायदा बांधकामप्रकरणी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटकेत असलेले अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि लिपिक ललित आमरे यांना मंगळवारी केडीएमसीच्या सेवेतून निलंबित करण्यात आले. यचा प्रकरणातील एक लिपिक भूषण पाटील यांच्याविरोधात कारवाई सुरू असून, त्याच्याही निलंबनाचा आदेश लवकर काढला जाणार आहे, असे केडीएमसी प्रशासनाने सांगितले.
लाचखोरी प्रकरणात घरत व दोन लिपिकांना १३ जूनला अटक झाली होती. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महापालिका आयुक्तांना कारवाईचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. त्यानंतर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई कोणत्या अधिनियमानुसार करता येऊ शकते हे तपासले. त्यानुसार आयुक्तांनी घरत व लिपिक आमरे यांना १४ जूनपासून निलंबित केले. तर, एका लिपिकाचे निलंबन बाकी आहे.
महापालिकेचे उपायुक्त सु. रा. पवार यांना यापूर्वी अडीच लाखांची लाच घेतना अटक झाली होती. नियमनानुसार, महापालिका प्रशासनाने लाचखोर अधिकाऱ्यांच्या निलंबन करून तो विषय सहा महिन्यांत महासभेत आणला पाहिजे. परंतु, पवार यांचे सहा महिन्यांत निलंबन करण्यात आलेले नव्हते. त्याचा फायदा त्यांना मिळाला. त्यामुळे ते महापालिकेच्या सेवेत पुन्हा रूजू झाले होते. अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडून पवार यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले गेले होते.
>कल्याण-डोंबिवली महापालिकेचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या निलंबनाचा विषय येत्या महासभेत मांडला जाणे अपेक्षित
आहे. महासभेच्या मंजुरीनंतर
विभागीय चौकशीही करावी, अशी मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे.