ठाण्यातील नागरिकांकडून दुधाचा अतिरिक्त साठा, कोरोना चाचणीस दूधविक्रेत्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 12:38 AM2021-04-11T00:38:52+5:302021-04-11T00:39:07+5:30
Thane : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या आठवड्यातील हा पहिला वीकेंड लॉकडाऊन होता. अत्यावश्यक सेवा वगळता या दोन्ही दिवशी कडक निर्बंध लागू केले आहेत.
ठाणे : वीकेंड लॉकडाऊनच्या भीतीने ठाणेकरांनी शुक्रवारच्या सायंकाळीच दुधाचा अतिरिक्त साठा करून ठेवला. शनिवार-रविवार दूध येणार नसल्याची भीती ठाणेकरांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांच्या दुधाची खरेदी केल्याचे ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेने सांगितले.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या आठवड्यातील हा पहिला वीकेंड लॉकडाऊन होता. अत्यावश्यक सेवा वगळता या दोन्ही दिवशी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या दोन्ही दिवशी दूधदेखील मिळणार नाही, ही भीती ठाणेकरांना होती. म्हणून त्यांनी आपापल्या रोजच्या दूध विक्रेत्यांना याबद्दल विचारणा केली. काही जणांनी त्यांना शनिवार-रविवार या दोन्ही दिवसांचे दूध आणून द्यायला सांगितले, तर काहींनी दुकानांत, दूध डेअरी येथे जाऊन ते विकत घेतले.
ठाणे शहरात दररोज जवळपास साडेचार ते पाच लाख लिटर दूध येते. परंतु, शुक्रवारी सायंकाळी जास्त दुधाची खरेदी झाली असल्याचे संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
चाचणी बंधनकारक!
सोसायट्यांनी दूध विक्रेत्यांना कोरोना चाचणी करण्याचे बंधनकारक केले आहे. सोसायटींनी चाचणी करण्याची सक्ती केल्यास त्यांना दूध टाकणार नाही, अशी भूमिका संस्थेने घेतल्याचे चोडणेकर यांनी सांगितले. याबाबत ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी म्हणाले की, प्रत्येकाने कोरोनाचाचणी करणे बंधनकारक आहे. कारण हा प्रत्येकाच्या जिवाचा प्रश्न आहे. व्यवसायही करायचा आहे आणि चाचणी नको, असे होत नाही.