अतिरिक्त शिक्षक अन्यत्र
By admin | Published: September 17, 2016 02:02 AM2016-09-17T02:02:34+5:302016-09-17T02:02:34+5:30
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील ३५४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यापैकी प्राथमिकच्या १५४ पैकी २७ शिक्षकांना जिल्ह्यातील रिक्त जागी सामावून घेण्यात आले
ठाणे : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील ३५४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यापैकी प्राथमिकच्या १५४ पैकी २७ शिक्षकांना जिल्ह्यातील रिक्त जागी सामावून घेण्यात आले असून उर्वरित १२७ शिक्षकांची जागेअभावी अन्य जिल्ह्यांत रवानगी केली आहे. याप्रमाणेच माध्यमिकच्या २०० शिक्षकांच्या समायोजनाचे काम मागील दोन दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी शिक्षकांनी एकच गर्दी केली आहे.
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना स्वत:च्या जिल्ह्यात प्राधान्याने सामावून घेण्याचे काम राज्यभर सुरू करण्यात आले आहे. ठाण्यात ते बुधवारपासून सुरू झाले. यामध्ये जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या १५४ प्राथमिक शिक्षकांपैकी २७ शिक्षकांचीच ठाणे जिल्ह्यात वर्णी लागली. यात २१ प्राथमिक व सहा पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. यानंतरही १२७ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांना आता उपसंचालकांकडे वर्ग केले आहे. आता या शिक्षकांना कोकण विभागातील मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत रिक्त असलेल्या जागांवर सामावून घेतले जाणार आहे. या वेळी दिलेल्या शाळेवर हजर न झालेल्या शिक्षकांचे वेतन रोखले जाणार आहे. याप्रमाणेच माध्यमिकचे २०० शिक्षक अतिरिक्त असून तितक्याच जागा जिल्ह्यात रिक्त आहेत. या रिक्त जागी शिक्षकांची वर्णी लावण्यासाठी येथील मंगला हायस्कूलमध्ये काम सुरू आहे. आॅनलाइन पद्धतीने हे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. रिक्त असलेली जागा भरण्यासाठी जात प्रवर्ग व विषय हे दोन निकष लावले जात
आहेत.
परंतु, प्रवर्गनिहाय जागा रिक्त दिसत असल्या तरी त्या ठिकाणी विषय नाही किंवा विषय असून जागा खुल्या किंवा मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. यामुळे बहुतांशी शिक्षकांची जिल्ह्यात वर्णी लावताना अडथळे येत असल्याचे निदर्शनास आले आहे. (प्रतिनिधी)