कंत्राटदाराचाच नाही पत्ता
By admin | Published: April 14, 2017 03:23 AM2017-04-14T03:23:03+5:302017-04-14T03:23:03+5:30
मीरा-भाईंदर पालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेना आणि भाजपामध्ये राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्याचा घाट दोन्ही पक्षाकडून
मीरा रोड : मीरा-भाईंदर पालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेना आणि भाजपामध्ये राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्याचा घाट दोन्ही पक्षाकडून घातला जात आहे. तीन वर्षापूर्वीच तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. त्यानंतर हे संकुल कंत्राटदाराअभावी बंदच आहे. मध्यंतरी झालेल्या आंदोलनानंतर केवळ कॅरम, बॅडमिंटनला सुरूवात झाली. मूळात कंत्राटदाराचाच पत्ता नसताना उद्घाटन कशासाठी? उद्घाटनानंतरही ते सुरू होणार का असा सवाल क्रीडापटूंनी विचारला आहे.
भाईंदर येथील क्रीडा संकुल चालवण्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्याची ओरड करणाऱ्या पालिकेने आलेल्या निविदांमध्ये इच्छुकांनी पालिकेस वार्षिक १५ लाख देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र निविदा समितीने मात्र पुन्हा फेरनिविदा मागवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. या प्रकारामुळे मर्जीतील कंत्राटदारासाठी पालिकेने खटाटोप चालवल्याचा आरोप माजी सभापती प्रमोद सामंत यांनी केला आहे.
मीरा- भार्इंदरमध्ये अद्ययावत क्रीडा संकुल असावे म्हणून तत्कालीन खासदार संजीव नाईक यांच्या प्रयत्नाने न्यू गोल्डन नेस्ट जवळ २०१२ मध्ये क्रीडा संकुलाच्या कामास सुरूवात झाली. तर फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी तरणतलाव आदी काही कामे अपूर्ण होती.
दरम्यान, क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होऊन ते चालवण्यासाठी पालिकेने धोरण ठरवत निविदा मागवल्या होत्या. पण प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पालिकेने स्वत: हून अनुदान देण्याची तयारी दर्शवली. अनेकदा निविदा मागवूनही प्रतिसाद मिळत नव्हता.
क्रीडा संकुलाचे बांधकाम व त्याच्या देखभालीसाठी कोट्यवधीचा खर्च होत असताना ते चालवण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्याने संकुल धूळखात होते. संकुल सुरू करण्यासाठी जिद्दी मराठा संस्थेच्या वतीने प्रदीप जंगम व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालिके बाहेर धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला विविध लोकप्रतिनिधी, संस्था व नागरिकांचे समर्थन मिळाल्याने अखेर पालिकेने कॅरम, बॅडमिंटन खेळ सुरू केले.
दरम्यान, पालिकेचे संकुल चालवण्यासाठी मागवलेल्या निविदेत एकूण चार इच्छुकांपैकी दोघांनीच दर दिला होता. २९ मार्चला तांत्रिक चाचणी केल्यावर निविदा उघडण्यात आली. यामध्ये एकाने १५ लाख ३ हजार तर दुसऱ्याने १५ लाख २५ हजार पालिकेला देण्याची तयारी दर्शवली. परंतु निवड समितीने मिळणारी रक्कम तुटपुंजी असून पुन्हा निविदा मागवण्यास सांगितले.
समितीमध्ये उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, लेखा परीक्षक निपाणी, मुख्यलेखाधिकारी शरद बेलवटे, शहर अभियंता शिवाजी बारकुंड व सबंधित विभागचे विभाग प्रमुख दीपक पुजारी उपस्थित होते. पुन्हा निविदा मागवण्याच्या समितीचा निर्णय धक्कादायक तसेच संशयास्पद असल्याची झोड उठू लागली आहे. (प्रतिनिधी)
निवड समितीने निर्णय रद्द करावा
- माजी सभापती प्रमोद सामंत यांनी निषेध केला असून अन्य कामांसाठी पैसा मिळतो, पण शहरातील खेळाडूंसाठी साधे क्रीडा संकुल सुरु केले जात नाहीत. फेरनिविदा मागवण्यामागे इच्छुक व मर्जीतील कंत्राटदाराशी असलेले साटेलोटे व त्यास काम मिळावे म्हणून चाललेला सर्व खटाटोप असल्याचे सामंत म्हणाले.
या संपूर्ण कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. निवड समितीने स्वहिताचा निर्णय घेतला असल्याने तो रद्द करा अशी मागणी त्यांनी केली.