अभिवाचन म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया : धनश्री लेले, पितांबरी कंठवटी अभिवाचन स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 04:57 PM2019-06-11T16:57:40+5:302019-06-11T16:58:45+5:30
संगीता धनकुटे शिक्षक गटातून तर आशिष भिडे खुला गटातून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
ठाणे : अभिवाचक आपल्या समोरच्या कागदावर लिहिलेलं वाचतो. हे करीत असताना या कागदावरील त्या हृदयी पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम तो करीत असतो. केवळ वाचन म्हणजे अभिवाचन नसून शब्दाला सजीव करून त्यात प्राण फुंकतो, तो अभिवाचक. अभिवाचन म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया आहे अशा शब्दात साहित्यिका आणि निरूपणकार धनश्री लेले यांनी मार्गदर्शन केले.
पितांबरी उद्योग समूह आणि व्यास क्रिएशन्स् आयोजित पितांबरी कंठवटी अभिवाचन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी उदय सबनीस, पितांबरी उद्योग समूहाच्या हेल्थ केअर युनिटचे डॉ. संदीप माळी, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, अभिवाचनाचे दोन प्रकार असतात, प्रकट वाचन आणि मूक वाचन. ग्रीक देशामध्ये याला विशेष महत्त्व आहे. विरामचिन्हे ही भाषेचा अलंकार आहेत. याचा अभिवाचकांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. आजच्या युगात जिवंतपणा,जिव्हाळा, जिद्य आणि जिज्ञासा हे चार फोर जी लक्षात ठेवावेत. उदय सबनीस म्हणाले, अभिवाचन ही वाचनाची पुढची पायरी आहे. जी कथा, गोष्ट, लेख आपण वाचणार आहोत, त्याचं वाचन करण्यापूर्वी ती समजून घेतली पाहिजे. अभिवाचन म्हणजे गोष्ट सांगणे.गोष्टीपर्यंत जो श्रोत्यांना घेऊन जातो, तो उत्तम अभिवाचक. मराठी भाषिकांची स्वतःची अशी एक भाषा आहे, अभिवाचन करताना ती जपलीच पाहिजे. पण प्रमाणभाषा सुद्धा समजून घेणं गरजेचे आहे. यावेळी पितांबरी प्रॉ. प्रा. लि. च्या के नील कफ सिरप आणि के नील कोल्ड बाम या उत्पादनांचे ग्राहकार्पण करण्यात आले. डॉ. संदीप माळी यांनी या उत्पादनांची माहिती दिली. वाचन चळवळ वाढावी या हेतूने पितांबरी उद्योग समूह आणि व्यास क्रिएशन्स् या संस्थांनी राज्यस्तरीय पितांबरी कंठवटी अभिवाचन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेची अंतिम फेरी 10 जून रोजी पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 750 स्पर्धकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला. प्राथमिक फेरीतून 130 स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. शिक्षक गटातून संगीता धनकुटे ( मो. ह. विद्यालय, ठाणे) यांनी प्रथम, सुप्रिया तळेकर (कामराज नगर म्युनिसिपल मराठी स्कूल, घाटकोपर) यांनी द्वितीय तर प्रतिक्षा बोर्डे ( मो. ह. विद्यालय, ठाणे) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. पश्चिम महाराष्ट्र विभागातून सुरेखा हिरवे ( सरस्वती माध्यमिक विद्यालय, श्रीकृष्णनगर, आकुर्डी, पुणे), मराठवाडा विभागातून कुंजीराम गोंधळे ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्रल्हादपूर, जालना), कोकण विभागातून नमिता आफळे (सोफिया पॉलिटेक्नीक, मुंबई), विशाखा देशपांडे (सरस्वती मंदिर ट्रस्ट, इंग्लिश मीडियम स्कूल, मुंंबई) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
खुला गटातून आशिष भिडे यांनी प्रथम, अक्षय शिंपी यांनी द्वितीय, अंजली शेवडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. पश्चिम महाराष्ट्र विभागातून प्रियांका शेजाळेे, अश्विनी मराठे, उत्तर महाराष्ट्र विभागातून रश्मी पवार, डॉ. रज्जाक शेख, कोकण विभागातून सौरभ नाईक, स्मिता मेढी -नीता जयवंत यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविली. बालगटातील आदि माळवदे याला विशेष पुरस्कार देण्यात आला. दोन्ही गटातील प्रथम क्रमांकासाठी 10,000/- रू. रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी 5000/- रू. रोख,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी 3,000/- रू. रोख,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ विजेत्यांसाठी रोख 2,000/- आणि प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप होते. शिक्षक गटामधील विजेत्यांना पारितोषिकाच्या रकमेची व्यास क्रिएशन्स् प्रकाशित पुस्तके त्यांच्या शाळेसाठी भेट देण्यात आली. सर्व विजेत्यांना पितांबरी उद्योग समूहातर्फे भेटवस्तू देण्यात आली. संतोष वेरूळकर, धनश्री करमरकर, श्रीरंग खटावकर, सुनिता फडके आणि वृंदा दाभोळकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. व्यास क्रिएशन्स्चे संचालक नीलेश गायकवाड यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. अमृता दीक्षित यांनी निवेदन केले.