जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण भागात लसींचा पुरेसा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:41 AM2021-03-17T04:41:42+5:302021-03-17T04:41:42+5:30

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोविशिल्ड लसीचा तुटवडा उद्भवल्याने दुसरा डोस मिळणार की नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या ...

Adequate stocks of vaccines in rural areas including District General Hospital | जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण भागात लसींचा पुरेसा साठा

जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण भागात लसींचा पुरेसा साठा

Next

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोविशिल्ड लसीचा तुटवडा उद्भवल्याने दुसरा डोस मिळणार की नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. मात्र, कोविशिल्ड लसींचा ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण भागातील आरोग्यकेंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे ग्रामीण भागात ज्यांनी ज्यांनी कोविशिल्डची पहिली लस घेतली असेल, त्यांना त्याची दुसरी लसही तिच दिली जाणार आहे.

मार्च महिन्याच्या १ तारखेपासून सर्वत्र ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांसह ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख २१ हजार ३६३ जणांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये एक लाख ८२ हजार ५३४ जणांना पहिला डोस दिला असून, ३८ हजार ८२९ जणांनी दुसरा डोस घेतला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिली.

फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. त्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याची चर्चादेखील जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे कोरोना लस घेण्यासाठी दिवसेंदिवस नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. अशातच ठाणे शहरात कोविशिल्ड लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने तिचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना महापालिका आयुक्त डॉ, विपिन शर्मा यांनी मात्र या लसीचा दुसरा डोस देण्याइतका साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध असलेल्या लसींबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना विचारले असता, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच पहिला डोस कोविशिल्डचा घेणाऱ्या नागरिकांनी विनाकारण चिंतीत होण्याचे कारण नसल्याचे सांगून त्यांना दुसरा डोसदेखील कोविशिल्डचाच दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारी रुग्णालय पहिला डोस दुसरा डोस

जिल्हा रुग्णालय - २४५५० - ६५५९

ठाणे मनपा - ६६२३२ - १२५५८

कल्याण डोंबिवली मनपा - २१५२२ - ४७३९

उल्हासनगर मनपा - ५३०५ - ११८७

मीरा-भाईंदर मनपा - २२८६५ - ३७८१

भिवंडी मनपा - ६७४४ - १७०४

नवी मुंबई मनपा - ३५३१६ - ८३०१

Web Title: Adequate stocks of vaccines in rural areas including District General Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.